ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांनी केली परस्पर भंगारविक्री

ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांनी केली परस्पर भंगारविक्री
■ दोन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची सदस्यांची मागणी


नांदगाव पेठ/प्रतिनिधी

     येथील ग्रामपंचायमध्ये दोन कर्मचार्यांनी  मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही विक्री ग्रामपंचायतीची कोणतीही मंजुरी न घेता केली गेली आहे. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी गोपाल शेळके व रविंद्र भोपळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे.
    या प्रकरणात सरपंच, उपसरपंच आणि सचिव यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. २५ जून २०२५ रोजी पार पडलेल्या मासिक सभेमध्ये काही सदस्यांच्या नावाने खोटा ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप निवेदनकर्ते सदस्यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केलेला आहे. यामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
    सदस्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ग्रामपंचायतीतील जुने खुर्च्या, ट्युबलाईट नळ्या, वायर, पाईप्स, कुलर आणि अन्य भंगार साहित्य हे कोणतीही लेखी परवानगी किंवा ठराव न घेता परस्पर विकण्यात आले. या प्रकाराची ०४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी तसेच कथित चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरपंच, सचिव व उपसरपंच यांच्यावर सुद्धा कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य साहेबराव उर्फ छत्रपती पटके,बलविर चव्हाण,किशोर नागापूरे, शिवराजसिंह राठोड, वृषाली इंगळे, आशा चंदेल,वंदना भटकर, उर्मिला गायगोले,मंदा कापडे,तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय चौधरी यांनी केली आहे.