आयकर भरणारे नागरिक,विद्यार्थी, व्यावसायिक रोजगार हमीचे मजूर

आयकर भरणारे नागरिक,विद्यार्थी, व्यावसायिक रोजगार हमीचे मजूर
■ रोजगार सेवकाने खोटे मजूर दाखवून केला लाखोंचा अपहार

■ रोजगार हमी सदस्य छत्रपती पटके यांनी केली चौकशीची मागणी

नांदगाव पेठ/प्रतिनिधी

     नांदगाव पेठ ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य आणि रोजगार हमीचे जिल्हास्तरीय सदस्य साहेबराव उर्फ छत्रपती पटके यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
     छत्रपती पटके यांनी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे की, ग्रामपंचायतीचे रोजगार सेवक संकेत साहेबराव चापके यांनी मस्टरवर खोट्या मजुरांची नावे दाखवून शासनाकडून लाखो रुपये निधीचा अपहार केला आहे. आयकर भरणारे, शासकीय सेवेत असलेल्या कुटुंबातील सदस्य ,विद्यार्थी व व्यावसायिक यांना मजूर म्हणून दाखवले असून, त्यांना प्रत्यक्ष कामावर न लावता त्यांच्या नावाने रकमेचा अपहार करण्यात आला आहे.
   विशेष म्हणजे, शिक्षक असलेले सुभाष वीर यांचा मुलगा गौरव वीर यांच्या नावाने गुरांचा गोठा, विहीर व रस्ता बांधकामासाठी पैसे काढले गेले. किराणा दुकान चालवणाऱ्या अनिकेत झगडे व शारदा पडधान, विकी पडधान तसेच खासगी काम करणारे अनिकेत सुंदरकर यांचे देखील नाव या यादीत असल्याची माहिती समोर आली आहे.यांची नावे मस्टरवर दाखवण्यात आली असून, हे लोक प्रत्यक्ष मजुरी करत नसतानाही त्यांच्या नावाने पैसे काढून रकमेचा अपहार झाल्याचा आरोप छत्रपती पटके यांनी केला आहे.
    या प्रकारामुळे शासनाच्या योजनांचा गैरवापर होत असून, गरजू आणि पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.ज्या गरजूंना योजना आवश्यक आहेत अश्या लाभार्थ्यांना डावलून ज्यांना गरज नाही अश्यांना त्याचा लाभ देण्यात आला आहे.सदर गैरव्यवहार करणाऱ्या रोजगार सेवक संकेत चापके तसेच या घोटाळ्यात सहभागी असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.