जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम
श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय पुढाकार
अमरावती / प्रतिनिधी
चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळेत जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपत निसर्ग संवर्धनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी शिवम चारथळ, नमन नारनवरे, सौरभ गिरडकर, मयूर भोयर, सौरव पाटील, वृषाल गवई व सुजल नागाने यांनी केले. त्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व सांगत शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाला केंद्रप्रमुख विजया धनकार, मुख्याध्यापिका बी. टी. साबळे (देवारे), शिक्षिका प्रणिता दमाके, कविता अब्रुक, मंगला भोयर, दीक्षा दुर्गाडे व अन्य शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचे महत्व व पर्यावरणपूरक जीवनशैलीचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम निर्माण करणारा आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण करणारा ठरला.विद्यार्थ्यांनी सुद्धा या मोहिमेत सहभागी होऊन शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड केली आणि वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली.