रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाकडून प्रदूषण नियंत्रणात गंभीर दुर्लक्ष
प्रदूषण विभागाला आढळल्या १३ गंभीर त्रूट्या
रतन इंडियाकडून अद्यापही त्रुटींची पूर्तता नाही
मंगेश तायडे/नांदगाव पेठ
नांदगावपेठ पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाने प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांकडे कायमस्वरूपी दुर्लक्ष केल्याचे निष्पन्न झाले असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीवर मोठी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीला प्रत्यक्ष भेट देऊन सखोल पाहणी केली. या पाहणीत प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे तब्बल १३ गंभीर उल्लंघन आढळले. या उल्लंघनांमध्ये वायू आणि राख व्यवस्थापनातील बेफिकिरी, धूळयुक्त परिस्थिती, सिस्टीमच्या देखभालीतील हलगर्जीपणा, तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम हे ठळक मुद्दे आहेत.
कंपनीने बॉयलर युनिटमधून होणाऱ्या धूराच्या उत्सर्जनावर कोणतीही परिणामकारक नियंत्रण प्रणाली राबवलेली नाही. ईएसपी यंत्रणा असली तरी ती कार्यक्षम नाही आणि धूर दाट प्रमाणात बाहेर पडतो आहे. राख संकलन आणि लोडिंग क्षेत्रात धूळ उडते आहे, रस्त्यांवर राख साचलेली असून पाणी शिंपडण्याची कुठलीही पुरेशी व्यवस्था नाही. राख वाहून नेणाऱ्या यंत्रणेजवळही धूळ उडते आहे, कोळसा क्रशर प्लांट व कोळसा वाहतूक बेल्ट्सची देखभाल अत्यंत निकृष्ट असून, धूळयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. कन्व्हेयर बेल्ट्सवर शिडकाव किंवा स्वच्छता यंत्रणा नसल्यामुळे प्रदूषण अधिक तीव्र होत आहे. शिवाय, राख सायलो आणि लोडिंग पॉईंटवर सुरक्षेसाठी रबर क्लॅडिंग्स बसवण्यात आलेली नाहीत.
कोळसा साठवण क्षेत्रात पाणी शिंपडण्याची व्यवस्था असूनही ती अपुरी आहे, आणि कोळसा यार्डमधील रस्ते काँक्रीट, बिटुमिनस नसल्यामुळे दुय्यम धूळ उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होत आहे. उद्योगाने स्वतःच्या पायाभूत यंत्रणा जसे की वायू गुणवत्ता मोजणारी उपकरणे बसवली असली, तरी प्रदूषण मंडळाच्या म्हणण्यानुसार ती अपुरी असून डेटा सर्व्हरशी जोडले गेले असले तरी क्षेत्राच्या व्यापासाठी ते पुरेसे नाहीत. या सर्व बेफिकिरीचा परिणाम वाघोली गाव आणि परिसरावर स्पष्टपणे जाणवतो आहे.प्रदूषण मंडळाच्या निरीक्षणात गावातील घरांच्या टेरेसवर, झाडांवर आणि शेतीमध्ये कोळशाच्या धुळीचे अंश आढळून आले. १७ ते २६ फेब्रुवारीदरम्यान केलेल्या वायुपरीक्षणात पीएम-१० चे प्रमाण मान्य मर्यादेपेक्षा जास्त असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
तसेच, उन्हाळ्यात वादळी हवामानामुळे निर्माण होणाऱ्या राखेच्या समस्यांसाठी कोणताही आपत्कालीन कृती आराखडा कंपनीने तयार केलेला नाही. हे सर्व पाहता प्रदूषण मंडळाने स्पष्टपणे नमूद केले आहे की, रतन इंडिया ऊर्जा प्रकल्प हा एक अपयशी उद्योग’ आहे, आणि प्रदूषण रोखण्यासाठी तीव्र दुर्लक्ष व निष्काळजीपणा व्यवस्थापनाने केला आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रतन इंडिया कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, १५ दिवसांच्या आत उत्तर न दिल्यास, वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याबरोबरच परवाना रद्द करण्याची आणि कायदेशीर कारवाई करण्याची चेतावनी दिली आहे.मात्र तीन महिने उलटूनही रतन इंडियाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही हे विशेष.परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून, प्रदूषणामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि शेतीवर होणाऱ्या दुष्परिणामांची दखल घेण्याची मागणी केली आहे.