सेवानिवृत्त सैनिकांकडून मिल्ट्री कँटीन मधील विदेशी मद्याची अवैध वाहतूक
वेलकम पॉईंटजवळ एक्साईज च्या भरारी पथकाची मोठी कारवाई ९.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती/प्रतिनिधी
भारतीय सैन्यातुन सेवानिवृत्त झालेल्या दोन माजी सैनिकांकडून मिल्ट्री कँटीन मधील विदेशी मद्याची अवैध वाहतूक करत असतांना राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने वेलकम पॉईंटजवळ सापळा रचून ९.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.१६ जुलैच्या सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. सेवानिवृत्त झालेल्या अनेक माजी सैनिकांच्या नावावर नागपूर येथील कँटीन मधून मद्याच्या बाटल्या घेऊन त्या चारचाकी वाहनाने अकोला पर्यंत विकण्याचा मोठा गोरखधंदा राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने उघडकीस आणला.
गुप्त व खात्रीशीर माहितीनुसार, अमरावती येथील राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने नागपूर-अमरावती मार्गावरील वेलकम पॉईंटजवळ सुझुकी कंपनीची ब्रेझा क्र. एम.एच.३०,ए झेड ६०३९ ही पांढऱ्या रंगाची चारचाकी थांबवून तपासणी केली असता, वाहनातील तीन टुरिस्ट बॅगमध्ये ७५० मि.ली. क्षमतेच्या विविध विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या. सदर मद्य दुसऱ्या एका अज्ञात वाहनात स्थलांतर करण्याचा प्रयत्न सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.
हे मद्य भारतीय सैन्याच्या कॅन्टीनमधून स्वतःच्या व इतर सेवानिवृत्त सैनिकांच्या कॅन्टीन कार्डवरून खरेदी करून त्याची अवैध वाहतूक केली जात होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी शांताराम हरी थाटे (वय ४५, रा. गीतानगर, अकोला) आणि रामेश्वर जानोजी पुंडकर (वय ५४, रा. संभाजीनगर, आकोट, जि. अकोला) हे दोघेही भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५(अ) आणि ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत विदेशी मद्य, वाहन आणि बॅग यासह एकूण ₹८,९७,३१६/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून खुल्या बाजारातील किंमत लक्षात घेतल्यास मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ₹९,९३,४००/- इतकी आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क मुंबई येथील आयुक्त डॉ. राजेश देशमुख,सहआयुक्त प्रसाद सुर्वे,प्रभारी विभागीय उपआयुक्त, डॉ. पराग नवलकर, आणि अधीक्षक शशीकांत गर्जे यांच्या आदेश व मार्गदर्शनातप्रभारी निरीक्षक संतोष पी. वायाळ,सुभाष एस. खरे, आकाश जाधव, सादीक नौरंगाबादे, अंकुश काळे,आर. पी. मोकळकर, पी. आर. भोरे,सुजीत जाधव,विठ्ठल कस्टे, जगदीश जव्हाण, गजानन वाकोडे, के. एम. मातकर, तसेच महिला कर्मचारी श्रीमती व्ही. बी. पारखी आणि कु. डी. डी. मानकर यांच्या संयुक्त पथकाने केली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक संतोष पी. वायाळ हे करीत आहेत.
'आर्मी' लिहिलेल्या वाहनातून मद्य वाहतूक
ज्या वाहनातून मद्य वाहतूक करण्यात येत होती त्या वाहनावर 'आर्मी' असे ठळक अक्षरात लिहिलेले होते. अशा प्रकारे अवैध मद्य वाहतुकीसाठी ‘आर्मी’ लिहिलेल्या वाहनाचा वापर करून अधिकार्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक नाकाबंदी व तपासणी दरम्यान या वाहनावर संशय येऊ नये म्हणून 'आर्मी' या शब्दाचा वापर करण्यात आला होता.
मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही शक्कल हाणून पाडत वाहन थांबवले आणि तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मद्य साठा आढळून आला.