नांदगाव पेठ वासीयांना शुद्ध पाणी कधी मिळणार ?

नांदगाव पेठ वासीयांना शुद्ध पाणी कधी मिळणार ?
दोन वर्षांपासून पाईपलाईन चे काम सुरू
जल जीवन मिशनचा ढिसाळ कारभार

नांदगावपेठ/प्रतिनिधी

   "हर घर जल, हर घर नल" या भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेला सुरुवात होऊन तब्बल दोन वर्षे झाली, तरीही नांदगावपेठसह परिसरातील ३२ गावांतील नागरिकांना अद्याप शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. यामागे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित कंत्राटदार यांची हलगर्जी व निष्काळजी भूमिका असल्याचा गंभीर आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य व जलसंधारण समितीचे सदस्य नितीन हटवार यांनी केला आहे.
   महामार्गालगत नांदगाव पेठ येथील शासकीय वसाहत मध्ये उभारण्यात आलेली तब्बल २० लाख लिटर क्षमतेची जलटाकी सध्या अपूर्ण अवस्थेत असून, टाकीत मोठ्या प्रमाणात लिकेजेस दिसून येत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, योजनेचे अर्धवट काम करून कंत्राटदारांनी निधी उचलला आहे. पाइपलाईनचे जाळे पूर्ण गावभर टाकले गेले असले तरी पाणीपुरवठा सुरु झालेला नाही.
   एमआयडीसी परिसरातील दूषित पाण्यामुळे आधीच पिण्याचे स्रोत बिघडलेले असताना, ही योजना सुरु न झाल्याने नागरिक विविध आजारांनी त्रस्त झाले आहेत. अनेक घरांमध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, लहान मुले, वृद्ध यांना त्रास सहन करावा लागत आहे.नांदगावकर जनतेचा संयम आता सुटू लागला आहे. योजनेचे काम झपाट्याने पूर्ण न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही नितीन हटवार यांनी दिला आहे.

            "कोट्यवधींच्या योजनेत मिलीभगत?"

"कोट्यवधी रुपये खर्चूनही जर योजना पूर्ण होत नसेल, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कंत्राटदार यांच्यातील मिलीभगतीचा संशय नाकारता येत नाही," असा स्पष्ट आरोप नितीन हटवार यांनी केला. त्यांनी ही योजना तात्काळ तांत्रिकदृष्ट्या दुरुस्त करून, नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.