अठरा महिन्याच्या बालकावर चुकीचे लसीकरण; आरोग्य सेविकेचे राक्षसी कृत्य, जाब विचारणाऱ्या वडिलांना धमकी
मंगेश तायडे / नांदगाव पेठ
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, माहुली जहांगिर अंतर्गत नांदगाव पेठ उपकेंद्रात नुकत्याच रुजू झालेल्या आरोग्य सेविका अर्चना ढोले यांनी अठरा महिन्याच्या निरागस बालकावर चुकीच्या पद्धतीने लसीकरण करून त्याच्या जीवाशी खेळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. लसीकरणानंतर त्या बालकाच्या पायावर मोठी गाठ आली, ताप वाढला आणि संपूर्ण रात्रभर बाळ वेदनेत तडफडत राहिले. यासंदर्भात विचारणा करताच संबंधित आरोग्य सेविकेच्या पती व मुलांनी बाळाच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी एकमुखीने संबंधित आरोग्य सेविकेला तात्काळ सेवेतून निलंबित करण्याची तसेच नांदगाव पेठ उपकेंद्रातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
१७ जुलै रोजी किशोर सुरेश तायडे यांच्या पत्नीने त्यांच्या अठरा महिन्याच्या बाळाला अंगणवाडी येथे लसीकरणासाठी नेले असता, आरोग्य सेविका अर्चना ढोले यांनी निष्काळजीपणे आणि जबरदस्तीने तीन वेळा इंजेक्शन टोचले. यामुळे बाळाला गंभीर त्रास होऊन लस टोचलेल्या भागावर मोठी गाठ आली आणि दोन दिवस तापाने फणफणला. याबाबत आरोग्य सेविकेला माहिती दिली असता तिने गृहभेट न घेता पालकांना थेट खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.खासगी डॉक्टरांनी बाळाच्या त्या गाठीवर शस्त्रक्रियेची शक्यता वर्तविली.
या घटनेबाबत स्पष्टीकरण मिळवण्यासाठी तायडे यांनी संबंधित सेविकेशी संपर्क केला असता, तिच्या पतीने उद्धटपणे संवाद साधत, “तुम्हाला तुमच्या बाळाचं काय करायचं ते करा,” असे म्हणत फोन बंद केला. यानंतर तायडे यांनी मित्रांसह उपकेंद्र गाठले. तेथे झालेल्या चर्चेदरम्यान सेविकेने आपली चूक मान्य करत खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा संपर्क केला असता ती अनुपस्थित राहून, तिचे पती आणि दोन मुले उपस्थित होते. त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग करत तायडे यांना आणि त्यांच्या मित्रांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकारामुळे तायडे यांनी थेट नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. ही घटना केवळ वैद्यकीय निष्काळजीपणाच नव्हे, तर जबाबदारीच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांवर दहशत निर्माण करण्याचा गंभीर प्रकार आहे, अशी संतप्त भावना ग्रामस्थांमध्ये आहे.गावकऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, “संबंधित आरोग्य सेविकेवर कठोर कारवाई करून तिला निलंबित करण्यात यावे, अन्यथा संपूर्ण गाव एकत्र येऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किशोर तायडे व गावकऱ्यांनी दिला.
आरोग्य सेविकेचा पती व मुलांची गुंडागर्दी
पीडित मुलाच्या वडिलांनी २९ जुलै रोजी नांदगाव पेठ येथील आरोग्य उपकेंद्र येथे जाऊन वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य सेविका यांच्याशी चर्चा करत असतांना आरोग्य सेविका ढोले यांच्या पतीने व दोन मुलांनी बाळाचे वडील किशोर तायडे यांची कॉलर पकडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच एका आरोग्य सेविकेचा हात पकडून तिचा विनयभंग देखील केला.आरोग्य सेविकेच्या पतीची व मुलांच्या गुंडागर्दीने परिसरात असलेले रुग्ण तसेच कर्मचारी दहशतीत वावरत आहे.
आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा-नितीन हटवार
या प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार,विनोद डांगे, पालक किशोर तायडे, अविनाश शिंदे,तालुका आरोग्य अधिकारी मनीषा सूर्यवंशी गावकऱ्यांसह आरोग्य उपकेंद्र येथे गेले असता त्याठिकाणी आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा प्रकार समोर आला. कर्मचारी वेळेत कर्तव्यावर उपस्थित नव्हते तसेच परिसरात अस्वच्छता आढळून आली.घडलेल्या घटनेबाबत संताप व्यक्त करत त्या आरोग्य सेविकेचा तातडीने निलंबित करावे अशी मागणी सुद्धा यावेळी नितीन हटवार यांनी केली.