रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पात कोळसा आणि ‘स्नॅक्सिस’ विक्रीचा गोरखधंदा
■ कंपनीला कोट्यवधींचा फटका; वरिष्ठ व्यवस्थापन अनभिज्ञ!
मंगेश तायडे/नांदगाव पेठ
रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पातून ऊर्जा निर्मितीसाठी येणारा कोळसा आणि राखेतून मिळणारे उच्च मूल्यमान असलेले स्नॅक्सिस रसायन परस्पर विक्री करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीतील काही अधिकाऱ्यांनीच हा घोटाळा केल्याचा संशय असून, त्यामुळे रतन इंडियाला दररोज लाखो आणि एकूण कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा जो ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जाणे अपेक्षित आहे, तोच कोळसा काही बाह्य कंपन्यांना चोरीछुपे विकण्यात येतो आहे. विशेष म्हणजे, ही विक्री अधिकृत कागदपत्रांशिवाय होत असल्याने त्याचा ठसा कंपनीच्या रेकॉर्ड्सवरही दिसत नाही. परिणामी, कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होत असून खर्च व नफा यामधील समतोल पूर्णपणे ढासळला आहे.
त्याहून गंभीर बाब म्हणजे, वीजनिर्मितीनंतर उरलेल्या राखेतून पाण्याच्या साह्याने वेगळे होणारे स्नॅक्सिस(रखेवरील बुडबुडे) नावाचे महागडे रसायन — ज्याची कॉस्मेटिक्स उद्योगात प्रचंड मागणी असून किंमत हजारो रुपये प्रति किलो आहे ते रसायनही दररोज मोठ्या प्रमाणात मुंबईतील एका खासगी कंपनीकडे चोरीछुपे विकले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात रतन इंडिया कंपनीतील काही अधिकारीच थेट सहभागी असून, त्यांनी एक संगठित जाळे तयार केले आहे. वरिष्ठ व्यवस्थापनाला या सर्व प्रकाराची कल्पना नसल्याचे समजते. कंपनीचा गाभा समजले जाणारे हेच अधिकारी आता कंपनीच्या मूळ हितांनाच सुरुंग लावत असल्याचे आरोप होत आहेत.
या गंभीर प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. औद्योगिक प्रकल्पातील कोळसा व रसायनसदृश महत्वाच्या बाबींची गैरवापरातून फसवणूक केवळ आर्थिक नाही, तर राष्ट्रीय संपत्तीची नासाडी आहे. शासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कोट्यवधींची अफरातफर – कोण आहे सूत्रधार ?
स्नॅक्सिस विक्रीत दररोज हजारो किलो रसायन बाहेर नेले जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. जर या रसायनाची बाजारभावाने गणना केली तर दररोज लाखो रुपयांची उलाढाल ही बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे. काही वाहतूकदार, स्थानिक एजंट्स आणि ठराविक अधिकाऱ्यांचे एक साखळी रूप असलेले नेटवर्क यामागे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
दिल्लीतील व्यवस्थापनच घालू शकते आळा
रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पातील एका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याचा अटीवर संबंधित प्रकाराला दुजोरा दिला असून याबाबत ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.मात्र दिल्ली येथील मुख्य व्यवस्थापन समिती यावर आळा घालू शकते असे त्यांचे म्हणणे आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून वरिष्ठ व्यवस्थापनाला ही बाब माहीत नसणे ही पण मोठी शोकांतिका आहे.