नवीन वाळू धोरणानुसार मेळघाटातील घरकुल लाभार्थ्याना पांच ब्रास वाळू उपलब्ध करून द्या
खासदार बळवंत वानखडे यांची जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे मागणी
अमरावती -
राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुधारित वाळू धोरणानुसार शासनाच्या विविध घरकुल योजनेच्या लाभार्थ्याना पाच ब्रास पर्यंत मोफत वाळू देण्याचा शासन निर्णय ८ एपरील २०२५ रोजी निर्गमित झाला होता. त्याची अंमलबजावणी देखील अमरावती जिल्ह्यात सुरु असून मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याना पाच ब्रास मोफत वाळू देण्याबाबत वाळू घाट उपलब्ध नसल्याने प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी मरावती यांची भेट घेऊन मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याना पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची लेखी पत्राद्वारे मागणी केली.
स्थानिक वापर व घरकुलासाठी सहज व सुलभतेने वाळू उपलब्ध करणे, तसेच पारंपारिक व्यवसाय करणा-या स्थानिक व्यक्तींना हातपाटी-डुबी पद्धतीने विनालिलाव पद्धतीचा वापर करुन वाळूगट उपलब्ध करुन देणे, खाजगी शेतजमिनीमध्ये नैसर्गिक कारणामुळे अथवा इतर कारणामुळे जमा झालेली वाळू निष्कासन करुन शेतजमीन लागवडीयोग्य करण्यासाठी वाळूचे निष्कासन करणे तसेच, नैसर्गिक वाळूचे पर्यावरणीय महत्त्व, नैसर्गिक वाळूचा तुडवडा या बाबी विचारात घेऊन कोणत्याही कॉक्रीटच्या बांधकामामध्ये कृत्रिम वाळूच्या वापरास प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त कृत्रिम वाळूचा वापर करणे, तसेच पर्यावरण अनुमतीप्राप्त वाळूगटामधून खाडी व नदीपात्रातील वाळूगटांसाठी लिलाव प्रक्रियेचा अवलंब करुन वाळू उत्खनन करणे व मोठ्या खाणींमधील ओव्हरबर्डनमधून निघणाऱ्या वाळूचा वापर करणे यासाठी सद्याच्या वाळू धोरणामध्ये शासनाने सुधारणा करून नवीन शासन निर्गमित केला. या नवीन सुधारित वाळू धोरणामध्ये वाळू उत्खननासाठी परवाना देण्यामागे वाणिज्यिक किंवा महसूल मिळविणे हा एकमेव उद्देश नसून, विकास कामांसाठी तसेच, नागरिकांना वैयक्तिक वापरासाठी सुलभतेने वाळू उपलब्ध व्हावी हा प्रमुख उद्देश आहे.
अमरावती जिल्ह्यात चिखलदरा आणि धारणी तालुके वगळता १२ तालुक्यातील विविध योजनेतील घरकुल लाभार्थ्याना ९००० ब्रास रेती महसूल प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात ४ टप्यात मोफत वाळू देण्यात येणार आहे. चिखलदरा आणि धारणी तालुक्यात देखील मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे या भागातील घरकुल लाभार्थ्यानी केली होती. त्यानुषंगाने खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना लेखी पत्राद्वारे या दोन्ही तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याना मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली. धारणी तसेच चिखलदरा तालुक्यात वाळूचे घाट उपलब्ध नसल्याने लगतच्या तालुक्यातून मोफत वाळू देणार असल्याचे जिल्हाधिकारी अमरावती यांनी सांगितले. यावेळी मा. वीरेंद्रभाऊ जगताप , माजी आमदार धामणगाव रेल्वे मतदारसंघ हे उपस्थित होते.