राजकुमार सुंदरानी हत्या प्रकरणातील दोन आरोपींना राजस्थान येथून अटक

राजकुमार सुंदरानी हत्या प्रकरणातील दोन आरोपींना राजस्थान येथून अटक
अमरावती शहर गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई 

नांदगाव पेठ / प्रतिनिधी

     नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एस.ए. इंपेरियल बार अँड रेस्टोरेन्ट समोर  १२ जुलै २०२५ रोजी झालेल्या हॅपी उर्फ राजकुमार सुंदरानी यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्यानंतर घटनेतील फरार दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट क्र. ०१, अमरावती शहर यांनी कोटा, राजस्थान येथून अटक केली.आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर  सतत लोकेशन बदलत असल्यामुळे तपास यंत्रणेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.मात्र अत्यंत शिताफीने दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
       रहाटगाव येथील एस.ए.इंपेरियल बार अँड रेस्टोरेन्ट येथे १२ जुलै रोजी राजकुमार सुंदरानी, आरोपी शिवानंद मनोहर फुलवाणी (वय ३४, रा. रामपुरी कॅम्प, अमरावती)
उमेश उर्फ बंटी अशोकराव पवार (वय ३२, रा. लोहार लाईन, विलासनगर, अमरावती) तसेच रवी तेजानी व अजय मेटानी यांनी मध्यरात्री पर्यंत सोबत मद्यप्राशन व जेवण केले. त्यांनतर मध्यरात्री ३:३० वाजताच्या दरम्यान शिवानंद फुलवानी आणि बंटी पवार या दोघांनी क्षुल्लक कारणावरून राजकुमार सुंदरानी यांच्याशी वाद घातला आणि चाकूने मांडीवर घाव करून तेथून दुचाकीने फरार झाले होते.प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे राजकुमार सुंदरानी यांना जागीच मृत्यू झाला होता.
       मृतक राजकुमार सुंदरानी यांचे मोठे बंधू फिर्यादी प्रकाश तहलराम सुंदरानी (वय ६४, रा. रामपुरी कॅम्प, अमरावती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर घटनेत  आरोपींविरुद्ध नांदगावपेठ पो.स्टे. येथे अप. क्र. २३१/२०२५, कलम १०३(१), ३(५) बीएनएस अन्वये दोन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेनंतर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा गांभीर्याने घेत तातडीने तपासाचे आदेश दिले. गुन्हे शाखा युनिट क्र. ०१ चे अधिकारी व अंमलदार यांनी सुरुवातीपासूनच घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते, मोबाईलचा वापर टाळत होते, तसेच कुणाशीही संपर्क ठेवत नव्हते.तपासादरम्यान आरोपी छिंदवाडा, इंदोरमार्गे जयपूरकडे पलायन करत असल्याची माहिती मिळाल्यावर, गुन्हे शाखा युनिट क्र. ०१ ने वरिष्ठांच्या परवानगीने गुमानपूरा, जिल्हा कोटा, राजस्थान येथे खाजगी बस थांबवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले.आणि दोन्ही आरोपींना घेउन गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सकाळी अमरावतीत पोहचले.
      पोलीस आयुक्त अरविंद चावरीया, उपआयुक्त रमेश धुमाळ, उपआयुक्त (परि. १)गणेश शिंदे,गुन्हे शाखा सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे, तसेच सहायक पोलीस आयुक्त कैलाश  फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, स.पो.नि. इमान नायकवडे, पोहवा फिरोज खान, पोहवा सतीष देशमुख, पो.हे.कॉ. सचिन बहाळे, प्रशांत मोहोड, अलीमुद्दीन खतीब, नाईक पो.अं. नाझीमुद्दीन सय्यद, विकास गुढधे, सचिन भोयर, रणजीत गावंडे, सुरज चव्हाण, निखील गेडाम, चालक अशोक खंगार, किशोर खेंगरे यांचेसहसायबर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. अनिकेत कासार, पो.हे.कॉ. निखिल माहूरे, पो.कॉ. अनिकेत वानखडे व म.पो.कॉ. सुषमा आठवले यांनी देखील या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.गुन्हे शाखेच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे खून प्रकरणातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले.