सहाय्यक कृषी अधिकारी ज्योती ठाकरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
■ जलतारा शोषखड्ड्यांमधून जलसंधारणाचे उत्कृष्ट उदाहरण; जिल्ह्यात सर्वाधिक 103 शोषखड्डे केले पूर्ण
नांदगाव पेठ / प्रतिनिधी
यावली शहीद येथे कार्यरत सहाय्यक कृषी अधिकारी ज्योती नितीन ठाकरे यांचा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अंतर्गत अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १०३ जलतारा शोषखड्डे यशस्वीरित्या पूर्ण केले. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या शेतात जलसंधारणासाठी प्रभावी ठरत असून, भूगर्भातील जलसाठा वाढवण्यास मोठा हातभार लागत असल्यामुळे शासनाच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले.
खरीप हंगाम २०२५ साठी आयोजित राष्ट्रीय कृषी विकास योजना,तृणधान्य अभियान अंतर्गत आयोजित "उत्पादकता वाढ कार्यशाळा व शेतकरी सन्मान सोहळा" नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे नुकताच पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आशिष येरेकर होते. कार्यक्रमाला विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, उपविभागीय कृषी अधिकारी पंकज चेडे, तसेच आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात खरीप पीक स्पर्धा २०२४-२५ चे विजेते, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, तसेच पीएमएफएमई अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषी क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कृषि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ज्योती ठाकरे यांचा सत्कार केला.
या उल्लेखनीय कार्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी पंकज चेडे यांचे मार्गदर्शन, तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने, मंडळ कृषी अधिकारी नीता कवाने आणि उप कृषी अधिकारी शुभांगी बोंडे, तसेच यावली गावातील सरपंच शिल्पा खवले, कृषी मित्र सुनील लंगडे, अक्षय भोपळे व रवींद्र वानखडे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे यावेळी ज्योती ठाकरे यांनी सांगितले.शासनाच्या वतीने सन्मानित झाल्यामुळे ज्योती ठाकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.