क्षुल्लक वादातून मित्राचा चाकूने भोसकून खून

क्षुल्लक वादातून मित्राचा चाकूने भोसकून खून
रहाटगाव येथील एस.ए.इंपेरियल बार अँड रेस्टोरेन्ट समोर मध्यरात्री रक्तरंजित थरार

आरोपी फरार, पोलिसांची शोधमोहीम सुरू

 मंगेश तायडे / नांदगाव पेठ

     रहाटगाव येथील एस.ए. इंपेरियल बार अँड रेस्टॉरंटसमोर शनिवारी मध्यरात्री ३:३० वाजता झालेल्या घटनेत क्षुल्लक वादातून दोघांनी मिळून आपल्या मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.राजकुमार तहलराम सुंदरानी (५२) रा. साई मंदिराजवळ,रामपुरी कॅम्प अमरावती असे घटनेतील ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे.
     घटनेची हकीकत अशी की, राजकुमार सुंदरानी हे घरी असतांना शुक्रवारी सायंकाळी ७:३० वाजता त्यांचे मित्र शिवा फुलवानी (४२) रा.रामपुरी कॅम्प, अमरावती, बंटी पवार (३०)  लोहार लाईन,विलास नगर,अमरावती हे दोघेही दुचाकी वाहनाने घरी आले आणि नंतर राजकुमार सुंदरानी यांना घेऊन बाहेर गेले.त्यानंतर काही वेळाने ते रहाटगाव येथील एस.ए.इंपेरियल बार अँड रेस्टोरेन्ट मध्ये गेले. त्यावेळी आणखी दोन मित्र रवी तेजानी, अजय मेटानी दोघेही रामपुरी कॅम्प अमरावती.हे सुद्धा सोबत गेले आणि त्याठिकाणी सर्वांनी मद्यप्राशन व जेवण केले. रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास राजकुमार सुंदरानी तसेच सर्व मित्र बाहेर आले.मध्यरात्री ३:३० वाजताच्या दरम्यान राजकुमार सुंदरानी आणि शिवा फुलवानी यांच्यात बाचाबाची झाली.बंटी पवार याने आपल्या खिशातून चाकू काढून तो शिवा फुलवानी याच्या हातात दिला आणि शिवा फुलवानी याने राजकुमार सुंदरानी यांच्या मांडीवर चाकूने वार केले आणि दोघेही दुचाकी वाहनाने तेथून पळून गेले.प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे राजकुमार सुंदरानी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
     घटनेची माहिती काही नागरिकांनी नांदगाव पेठ पोलिसांना दिली. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला राजकुमार सुंदरानी यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला.याबाबत कुटुंबियांना माहिती देण्यात आली त्यांनतर राजकुमार सुंदरानी यांचे मोठे बंधू प्रकाश सुंदरानी यांनी बार समोरील सीसीटीव्ही फुटेज बघून नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
नेत्यांच्या बार ला रात्रभर मुभा
एस.ए. इंपेरियल बार अँड रेस्टोरेन्ट हे शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्याचे असून या बार ला रात्री तीन ते चार वाजेपर्यंत ग्राहकांची वर्दळ असते. नेत्यांच्या या  बार ला शासनाचे कोणतेही नियम लागू नसून पोलीस देखील कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.महामार्गावर रात्रभर बार अँड रेस्टोरेन्ट सुरू असल्यामुळे अश्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक याठिकाणी येतात आणि त्यानंतर खुनासारख्या गंभीर घटना घडतात.पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकारावर लक्ष देण्याची गरज आहे.