महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार
आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल
अमरावती,
महसूल दिनाच्या निमित्ताने १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात वृक्षारोपण, दाखले वाटप आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
महसूल दिनानिमित्त जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात एक लाखाहून अधिक वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाशी समन्वय साधून रोपांची उपलब्धता करून घेण्यात येणार आहे. यासोबतच स्वामित्व योजनेअंतर्गत पट्टेवाटपाचेही कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच नोंदणी विभागाकडून जुने दस्तावेज नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अभियानांतर्गत पानंद रस्ते मोकळे करून या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच महसूल तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येणार आहे. धारणी तालुक्यात सुमारे अडीच हजार जात प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच थेट लाभाच्या योजना, आधार अपडेट, रेती पास वाटप आदी उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
महसूल सप्ताहात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच महसूल सप्ताहाचा शुभारंभ होईल. या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यात उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांना पुरस्कार वितरण आणि मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागेचे पट्टे वाटप कार्यक्रम करण्यात घेण्यात येणार आहे. ३ ऑगस्ट रोजी पाणंद व शिवारांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात येतील. ४ ऑगस्ट रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' प्रत्येक मंडळनिहाय राबविण्यात येईल.
५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांना डीबीटी झालेली नाही, त्यांना घरभेटी देऊन डीबीटी करून अनुदानाचे वाटप करण्यात येईल. ६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करून ती अतिक्रमणमुक्त करण्याचे धोरण ठरविण्यात येईल. तसेच शर्तभंग झालेली जमीन शासनाकडे जमा करण्याचा निर्णय घेतला जाईल. ७ ऑगस्ट रोजी एम सँड धोरणाची अंमलबजावणी आणि नवीन मानक कार्यप्रणालीनुसार धोरण पूर्णत्वास नेण्यात येईल. याच दिवशी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ होणार आहे.