■ १५ वर्षीय तरुणीची आशियाई युवा शिखर परिषदेत चमकदार कामगिरी
अमरावती / प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी या छोट्याशा गावातील १५ वर्षीय कु. वेदीका विद्या इंगळे हिने जागतिक व्यासपीठावर आपला ठसा उमटवत भारताचा मान उंचावला आहे. नुकत्याच थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या आशियाई युवा शिखर परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत तिने सामाजिक, सांस्कृतिक, धोरणात्मक व उद्योजकीय विषयांवर प्रभावी मते मांडली. आशियातील विविध देशांतील तरुणांना एकत्र आणणाऱ्या या महत्त्वाच्या परिषदेत वेदीकाच्या वक्तृत्वाने सर्वांची मने जिंकली, तर तिच्या टीमने सर्वोत्कृष्ट समूह हा किताब मिळवत यशाचे शिखर गाठले.
या परिषदेत भारताकडून प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या वेदीकाने आपल्या टीमसह तरुणांच्या नेतृत्वाखालील नवनवीन धोरणांवर व्यापक चर्चा करत महत्त्वपूर्ण उपाय मांडले. यामध्ये देश-प्रादेशिक स्तरावर अधिकृत युवक धोरण परिषदांची स्थापना करून तरुणांना थेट निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे, शासन व युवावर्गातील संवाद मजबूत करणे, सामाजिक-आर्थिक समस्यांवर ठोस उपाय साधणे तसेच आंतरदेशीय सहकार्य, मेंटॉरशिप आणि स्थानिक यशस्वी उपाययोजना इतर देशांत लागू करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमांमुळे मानसिक आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवे मार्ग खुलतील, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय युवांचा सशक्त आवाज निर्माण होईल असे मत वेदिकाने व्यक्त केले.
वेदीका केवळ वक्तृत्वातच नव्हे तर तंत्रज्ञान आणि उद्योजकतेतही पुढे आहे. ती एका यशस्वी उद्योजकासोबत महत्वपूर्ण प्रोजेक्टवर कार्यरत असून, हार्वर्ड विद्यापीठाचा सायबर सिक्युरिटी कोर्स पूर्ण करत आहे. इंस्टाग्रामवर तब्बल ८५,७०० फॉलोअर्ससह ती तरुणांना प्रेरणादायी मार्गदर्शन देणारी लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आहे. अल्पावधीतच साहित्य, समाजमाध्यम, आंतरराष्ट्रीय परिषद आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मिळवलेले तिचे यश हे तरुणाईसाठी आदर्शवत आहे.कापुसतळणीच्या तायडे कुटुंबातील ही लहानशी पण ध्येयवेडी मुलगी आज संपूर्ण तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.
उद्या वेदीकाच्या पुस्तकाचे वेबसाईटवर प्रकाशन
वेदीका उत्कृष्ट लेखिका असून तिने वयाच्या १५ व्या वर्षीच आपले पहिले पुस्तक लिहिले आहे. उद्या १५ ऑगस्ट रोजी “सोशल मीडिया अॅडिक्शन” या विषयावरचे नवे पुस्तक ती स्वतःच्या वेबसाईटवर प्रकाशित करणार आहे.