भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते साहेबराव आमले यांचे निधन
नांदगाव पेठ / प्रतिनिधी
भाजपचे जेष्ठ, निष्ठावान आणि कार्यकर्त्यांसाठी सदैव उपलब्ध राहणारे साहेबराव नारायणराव आमले (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण विदर्भातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.साहेबराव आमले हे भाजपच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या काळापासून पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक तरुणांना राजकारणात व सामाजिक चळवळीत सक्रिय केले.
सामाजिक कार्यात देखील त्यांचे योगदान मोलाचे होते. जय बजरंग क्रीडा मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांनी खेळांच्या माध्यमातून युवकांमध्ये शिस्त, संघभावना आणि सामाजिक बांधिलकी निर्माण केली. गावातील सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, तसेच धार्मिक उत्सवांत त्यांचा सहभाग लक्षणीय होता.अलीकडच्या काळात त्यांनी भाजपच्या लहान-मोठ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांचा सौम्य स्वभाव, जमिनीशी नाळ जोडून ठेवणारी वृत्ती आणि सर्वांना सन्मान देणारी कार्यपद्धती यामुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते.
त्यांच्या निधनाची वार्ता कळताच कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने त्यांच्या घरी धाव घेतली.भाजप, शिवसेना उबाठा पक्ष व विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.शनिवारी दुपारी १ वाजता स्थानिक नारायणपूर देवस्थान येथे त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.