केंद्राच्या योजना राबविताना गुणवत्ता राखावीखासदार बळवंत वानखेडे

केंद्राच्या योजना राबविताना गुणवत्ता राखावी
खासदार बळवंत वानखेडे

    अमरावती -
केंद्र शासनाच्या निधीमधून जिल्हास्तरावर विविध योजना राबविण्यात येतात. यातून नागरिकांना आवश्यक असणारी विकास कामे करण्यात येतात. ही विकास कामे करताना यंत्रणांनी गुणवत्ता राखावी, असे आवाहन जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार बळवंत वानखेडे यांनी केले.

    जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. यावेळी समितीचे सहअध्यक्ष खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण तायडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा, उपवनसंरक्षक अर्जुना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास, समितीचे सदस्य मोरेश्वर वानखडे, प्रतिभा गौरखेडे आदी उपस्थित होते.

    ग्रामीण भागात विविध योजनांमधून रस्त्यांची कामे करण्यात येतात मातोश्री पांदण योजनेमध्ये घेण्यात येणारी कामे तहसीलदारांनी भेट देऊन पाहणी करावी. या रस्त्यांची गुणवत्ता राखली जाईल, यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांसाठी काम करणाऱ्याला पाच वर्ष जबाबदार धरल्या जात असले तरी चांगल्या प्रतीचे काम व्हावे, यासाठी आग्रही असावे.

    जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासी बहुल आणि दुर्गम भाग आहे. या क्षेत्रातील कामावर यंत्रणांनी लक्ष ठेवावे. पुरामुळे रस्ते वाहून जात असल्याने या सुविधांची वेळोवेळी पाहणी करण्यात यावी. तसेच वनक्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी वेळेत परवानगी घ्यावी. परवानगीबाबत काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

    मेळघाटमध्ये दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा महत्त्वाचे आहे. नेटवर्क नसल्याने कामे होण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. याबाबत बीएसएनएलने तातडीची पावले उचलून इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा उपलब्ध करून द्यावी. डिजीटल इंडिया आणि आपले सरकार सेवा केंद्राचे काम सर्व नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. सेतू केंद्रांचे डिजीटल मॉनिटरिंग करण्यात यावे. तसेच नागरिकांना सर्व सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.

    युवकांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. याचाही लाभ शेवटच्या घटकाला होण्यासाठी कार्य करावे. प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना बँकांनी कर्ज उपलब्ध करून दिल्यास ते स्वत:चा व्यवसाय उभारू शकतील. प्रशिक्षणामध्ये दिनदयाल उपाध्याय ग्रामीण प्रशिक्षणाचाही समावेश करण्यात यावा. शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार हा दर्जेदार असावा. यात विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करण्यात येऊ नये. पाणी पुरवठ्याचा योजना या तातडीने पुर्ण करण्यात याव्यात. तसेच घनकचरा आणि सांडपाणी यांचे नियोजन करण्यात यावेत. राष्ट्रीय कुटुंब सहाय योजनेतून विविध योजना राबविण्यात येत आहे. याचाही लाभ देण्यासाठी यंत्रणांनी पाठपुरावा करावा, असे निर्देश खासदार वानखेडे यांनी दिले.