एसएमएस कंपनीचे दूषित पाणी जलस्रोतांत
प्रा.मोरेश्वर इंगळे यांचा प्रशासनाला इशारा
तातडीने कारवाई करण्याची मागणी
नांदगाव पेठ / प्रतिनिधी
नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरातील एसएमएस कंपनीतून निघणारे केमिकलयुक्त दूषित पाणी थेट जलस्रोतांमध्ये मिसळत असल्याचा प्रकार पुन्हा उघड झाला आहे. या गंभीर घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी तातडीने प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पाहणी करण्यास भाग पाडले.
वारंवार असे प्रकार घडत असून, प्रदूषण विभाग व एमआयडीसी प्रशासन जाणूनबुजून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रा. इंगळे यांनी केला आहे. केमिकलयुक्त पाणी नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमध्ये मिसळत आहे, ज्यामुळे भविष्यात हजारो नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो,पावसाळा सुरू झाला की हा प्रकार दरवर्षी होतोच मात्र प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना करत नसल्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळ सुरू असल्याचा आरोप वारंवार होत आहे.
या प्रकरणी तातडीने योग्य ती कारवाई केली नाही, तर एसएमएस कंपनीविरुद्ध तीव्र आंदोलन उभारले जाईल.असा इशारा प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी दिला आहे. ही केवळ पर्यावरणाची नव्हे तर जनतेच्या आरोग्याशी संबंधित जीवन-मरणाची बाब आहे.प्रशासनाने या गंभीर समस्येची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.