विद्यार्थ्यांसाठी मोलाचा हातभार : स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जि. प. मराठी शाळा माहुली जहागीरला आर्थिक मदत
नांदगाव पेठ / प्रतिनिधी
माहुली जहागीर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला स्व. सौ. हिराबाई तुळशीरामजी गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ५,००० रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. ही मदत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली असून, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवासात बळ मिळावे, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे.
ग्रामीण शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखनसामग्री, वह्या-पुस्तके, शैक्षणिक साधनसामग्री यांचा अभाव भासत असतो. या गरजांची जाणीव ठेवून ट्रस्टने पुढाकार घेतला असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या सर्वरोग निदान व उपचार शिबिरात शाळेच्या मुख्याध्यापिका कडू मॅडम यांना आ. राजेश वानखडे यांच्या हस्ते पाच हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी आमदार राजेश वानखडे, विवेक गुल्हाने, मनोज यावले, सरपंच प्रीतीताई बुंदिले, वंदनाताई हरदे, सालोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राऊत, प्रदीप गौरखेडे, शिगाने साहेब, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष हारूनभाई, भाजपचे अमरावती तालुकाध्यक्ष विरेंद्र लगडे यांचे सह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.