अमरावती शिक्षण विभागातील सर्व अधिकारी सामुहीक रजेवर

अमरावती शिक्षण विभागातील सर्व अधिकारी सामुहीक रजेवर
■ जिल्हाधिकारी अमरावती यांच्या मार्फत शासनाला पाठवले निवेदन

 ■ शिक्षण विभागातील सर्व महत्वाच्या कामाला लागणार ब्रेक

■ कर्मचारी कामे व विद्यार्थी लाभाच्या योजना आता लाबणीवर जाणार

प्रतिनिधी अमरावती :- मागील तीन चार महिन्यांपासून नागपूर विभागातील बोगस शालार्थचे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. वर्तमान पत्रातील बातम्या, नागपूर विभागात कार्यरत शिक्षण अधिकारी, उपसंचालक यांचेशी झालेली चर्चा व मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), म.रा., पुणे यांचा प्राथमिक चौकशी अहवाल या बाबींवरुन सदर बोगस शालार्थ प्रकरण हे सायबर स्कॅम असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. यामध्ये बोगस शिक्षकांना बोगस शालार्थ आय.डी. देवून त्यांचे शालार्थ प्रणालीतून वेतन अदा होत असल्याची बाब गंभीर आहे. शालार्थ प्रणालीत तांत्रिक छेडछाड किंवा लॉगिन आय.डी. व पासवर्ड वापरून गैरपध्दतीने, अनाधिकाराने सदर कृत्य झाले असावे. असे संघटनेचे मत आहे. सदर गुन्हा करणारे खरे गुन्हेगार लवकरात लवकर शोधून त्यांचेविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत.

तथापि, मागील काही दिवसांमध्ये नागपूर विभागातील काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस विभागाने अटक केलेली आहे. सदर प्रकरणी पोलीस विभागाचे एस.आय.टी. मार्फत तपास सुरु आहे. त्यातच मागील आठवड्यात नागपूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनाही वेतन बिलावर प्रतिस्वाक्षरी केली म्हणून अटक झाली आहे. या अटक सत्रामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र राज्यातील खाजगी शाळांमधील कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ व महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ नुसार सेवाशर्ती लागू आहेत. त्यानुसार संबंधित शिक्षण संस्था ही नियुक्ती प्राधिकारी आहे. उपरोक्त नियमानुसार शाळा समिती ही अनुदानित कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन त्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांना कळवतात. सन २०१७ पासून राज्यात शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन पवित्र प्रणाली सुरु आहे. (अल्पसंख्याक संस्था वगळून) तसेच वेळोवेळी निर्गमित झालेल्या प्रचलित शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव संबंधित शिक्षणाधिकारी यांचेकडे पाठवितात. त्या संबंधित शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांना शिक्षणाधिकारी यांनी वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर संबंधित मुख्याध्यापक त्या कर्मचाऱ्याचा समावेश ऑनलाईन शालार्थ वेतन प्रणालीत होण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव पुनश्न संबंधित शिक्षणाधिकारी यांना पाठवितात. सदरचा शालार्थ प्रस्ताव शिक्षणाधिकारी संबंधित मा. विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करतात. सदर शालार्थ आय.डी. बाबत मान्यता मा. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिल्यावर त्यांचे कार्यालयातून संबंधित शाळेला ऑनलाईन ड्राफ्ट पाठविला जातो. संबंधित शाळा मुख्याध्यापक हे ऑनलाईन ड्राफ्ट मध्ये आवश्यक माहिती भरुन ती अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठवितात. त्यानंतर वेतन पथक अधीक्षक संबंधित शाळेला वेतन देयक सादर करण्यास सुविधा निर्माण करुन देतात. मुख्याध्यापक हे वेतन पथक अधीक्षक यांचेकडे ऑनलाईन वेतन देयक सादर करतात. त्या वेतन देवकास वेतन पथक अधीक्षक तपासून मंजूरी देतात. एकत्रित MTR वर शिक्षणाधिकारी प्रतिस्वाक्षरी करतात, त्यानंतर अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक हे वेतन देयक जिल्हा कोषागार अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करतात, वेतन देयक मंजूरीनंतर सदर वेतनाची रक्कम मुख्याध्यापक खात्यावर जमा होते. त्यानंतर मुख्याध्यापक संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यावर वेतनाची रक्कम वर्ग करतात. अशा पध्दतीने खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांना वेतन अदा होते, या प्रक्रीयेत संबंधित मुख्याध्यापक पाच ते सहा वेळा संबंधित कर्मचाऱ्याच्या बाबत कागदपत्रांचे सादरीकरण व प्रमाणीकरण करत असतात. त्यानंतर वेतन पथक अधीक्षक वेतनाबाबतची कार्यवाही करतात.
विभागातील अधिकाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागण्यांबाबत अद्यापही सकारात्मक विचार न झाल्याने राज्यातील शिक्षण सेवेतील गट अव बचे अधिकारी तसेच कर्मचारी हे शुक्रवार दि.०८.०८.२०२५ पासून बेमुदत सामुहीक रजा आंदोलन सुरु करणार आहेत. त्यामुळे होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी किंवा संघटनेची कोणतीही जबाबदारी राहणार नाही.असे निवेदन अमरावती जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात.यावेळी निलिमा टाके  गुल्हाने  शिक्षण उपसंचालक अमरावती, डॉ.जयश्री राऊत सचिव विभागीय मंडळ अमरावती,प्रिया देशमुख शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती,सतीश मुगल शिक्षणाधिकारी प्राथमिक  अमरावती,सचिन गुल्हाने वेतन पथक अधीक्षक अमरावती,निखिल मानकर उपशिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती,सुनिता साबळे अधिक्षक शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती, रजनी शिरभाते अधीक्षक शिक्षणाधिकारी प्राथमिक अमरावती,संगीता साळुंखे सहाय्यक सचिव विभागीय मंडळ अमरावती, संदीप बोडखे गटशिक्षणाधिकारी अमरावती,विनोद गाडे गटशिक्षणाधिकारी वरूड,प्रसाद संकपाळ गटशिक्षणाधिकारी नांदगाव खंडेश्वर, नितीन उंडे गटशिक्षणाधिकारी तिवसा,जी बी मोरे,सुनील खाडे,नंदकिशोर खरात,गणपत वरघट गटशिक्षणाधिकारी धरणी,विलास बाबरे,नरेंद्र गायकवाड,सतीश इंगळे, मिलिंद साधू इतरही अधिकरी कर्मचारी मोठा संख्येने उपस्थित होते.