गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या अचानक भेटीत सहा शिक्षक लेटलतीफ ,अधिकारी संतप्त
नांदगाव पेठ / प्रतिनिधी
शासनाच्या शिक्षण विभागामार्फत ग्रामीण भागातील शाळांमध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, शाळांतील शिक्षकांच्या शिस्तीबाबत अजूनही दुटप्पीपणा दिसून येतो. याच पार्श्वभूमीवर अमरावती पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी बोडखे आणि शिक्षण विस्तार अधिकारी खोडे यांनी आज येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला अचानक भेट दिली असता या अनपेक्षित भेटीदरम्यान शाळेतील सहा शिक्षक लेटलतीफ आढळले.
सहा शिक्षक निर्धारित वेळेच्या तब्बल अर्धा तास उशिरा उपस्थित झाल्याचे निष्पन्न झाले. शाळेचा ठरलेली निर्धारित वेळ सकाळी १०:३० असूनही शिक्षक उशिरा आल्याने अधिकाऱ्यांनी शाळेचे प्राचार्य देवेंद्र ठाकरे यांच्याकडे याबाबत जाब विचारला.गटशिक्षण अधिकारी बोडखे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सर्व शिक्षकांनी वेळेचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर आणि शिस्तबद्ध शिक्षण देणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. यावेळी त्यांनी सर्व शिक्षकांना तात्काळ वेळेच्या शिस्तीचे पालन करण्याचे निर्देश दिले.
यावेळी भेटीदरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार, शाळा समितीचे माजी अध्यक्ष अरुण राऊत, तसेच पालक मनोज मोरे हे देखील उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी शाळेच्या कार्यप्रणालीचा आढावा घेत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम, उपक्रम, व त्यांच्या अडचणी याबाबत माहिती घेतली.यावेळी नितीन हटवार यांनी पालक, शिक्षक आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम शिक्षण देण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत हटवार यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम व आकर्षक बनाव्यात.जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा उंचावत राहिला, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल खासगी शाळांऐवजी जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वाढेल, आणि शिक्षण अधिक समृद्ध होईल,असे मत नितीन हटवार यांनी व्यक्त केले.या ठिकाणी अकरावी व बारावीला मंजूर तीन पदे असताना केवळ एक शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहे त्यामुळे उर्वरित दोन पदे ताबडतोब भरण्याची विनंती देखील यावेळी नितीन हटवार यांनी अधिकाऱ्यांकडे केली.