संगमेश्वर मंदिरावर खाजगी ताबा दाखविण्याचा प्रयत्न ?

संगमेश्वर मंदिरावर खाजगी ताबा दाखविण्याचा प्रयत्न ? 
■ शिवभक्त आक्रमक, ग्रामपंचायतीकडे खुलास्याची मागणी

नांदगाव पेठ /प्रतिनिधी 

     येथील पुरातन संगमेश्वर महादेव मंदिरावर काही खाजगी व्यक्ती ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर तक्रार समोर आला आहे. मंदिराच्या भिंतीवर सावर्डी ग्रामपंचायतीच्या नावाने खोटी नोटीस लावण्यात आल्याने, शिवभक्तांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.मंदिराचे व्यवस्थापन बदल करणे, मंदिराचे नाव ठरविणे यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी मंदिर परिसरात ग्रामसभा आयोजित करण्यात आल्याची नोटीस झळकवण्यात आलेली आहे.विशेष म्हणजे हे मंदिर नांदगाव पेठ ग्रामपंचायतच्या हद्दीत येत असून सावर्डी ग्रामपंचायतच्या नावाने दिशाभूल करणारी नोटीस लावण्यात आली.
      संगमेश्वर संस्थान परिसरात दोन पुरातन महादेव मंदिरे असून, राज्य शासनाच्या तीर्थ क्षेत्र विकास निधीतून या ठिकाणी अनेक विकासकामे पार पाडण्यात आली आहेत. परिणामी, या पवित्र स्थळी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः श्रावण मास व महाशिवरात्रीसारख्या पर्वांमध्ये येथे भव्य धार्मिक कार्यक्रम व दिंड्या आयोजित केल्या जातात.
मंदिरात वाढती देणगी, पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम पाहता काही विनाशकारी प्रवृत्तींचे लोकं आर्थिक व्यवहार करत असून, मंदिर व्यवस्थापनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवभक्तांकडून करण्यात येत आहे.
    या पार्श्वभूमीवर शिवभक्तांनी ग्रामपंचायतीकडे दोन्ही मंदिरांचा ताबा पूर्णतः स्वतःकडे घेऊन येथे अधिकृत ग्रामपंचायत कर्मचारी नेमण्याची मागणी केली आहे. अन्यथा, ग्रामपंचायतीला शिवभक्तांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय, धार्मिक कार्यक्रमांतून जमा झालेली देणगी काही खासगी लोकांकडे शिल्लक असल्याचाही आरोप करण्यात येत असून, याकडेही ग्रामपंचायतीने तात्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. तसेच, उपलब्ध निधीतून मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचीही मागणी भाविकांनी केली आहे.
एकाने मंदिराच्या सभागृहात केले होते अतिक्रमण
संगमेश्वर मंदिर सध्या पंचक्रोशीतील महत्वाचे मंदिर मानले जात असून याठिकाणी भाविकांची रेलचेल वाढली आहे. भाविकांच्या दृष्टीने येथे तत्कालीन आमदार यशोमती ठाकूर यांच्या निधीतून दहा लक्ष रुपयांचे सभागृह बांधण्यात आले होते मात्र त्याठिकाणी एका व्यक्तीने अतिक्रमण करून व्यवस्थपणाला वेठीस धरले होते. अखेर ग्रामपंचायतच्या पुढाकाराने पोलिसांची मदत घेऊन कायदेशीर मार्गाने सदर व्यक्तीचे अतिक्रमण हटविण्यात आले होते. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी ग्रामपंचायतने ठोस कार्यवाही करणे गरजेचे आहे