नवसारी वस्तीगृह भ्रष्टाचार प्रकरण : प्रशासनाचे मौन संशयास्पद

नवसारी वस्तीगृह भ्रष्टाचार प्रकरण : प्रशासनाचे मौन संशयास्पद
आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची मागणी 

अमरावती / प्रतिनिधी


   आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृह, क्षमता 500, नवसारी अमरावती येथे झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय सोळंके यांनी दिलेली तक्रार प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.सर्वत्र या प्रकाराची निंदा होत असतांना मात्र प्रकल्प अधिकारी धारणी यांचेकडे लेखी तक्रार दाखल होऊनही प्रशासनाने आजवर कुठलीही दखल घेतली नाही हे विशेष!
      विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधी लाटून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्यांविरोधात कारवाई करायची सोडाच, पण त्यांच्याच संरक्षणासाठी प्रशासन मौन बाळगत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाचे हे मौन आता भ्रष्टाचाराचे आशीर्वाद मानले जाऊ लागले असून, संतप्त नागरिक आणि सामाजिक संघटनांनी “भ्रष्टाचार लपविण्याऐवजी प्रशासनाने दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
     या प्रकरणात सहभागी असलेल्या गृहप्रमुख पटेल यांनी आपल्या घरातील संस्था, बचत गट, प्रतिष्ठानांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा मलिदा लाटल्याचे गंभीर आरोप आहेत. आता हे संपूर्ण प्रकरण केवळ शिस्तभंगापुरते मर्यादित न ठेवता थेट आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीस सोपवले जावे, अशी मागणी अधिक जोर धरू लागली आहे.शासकीय पदावर राहून विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधी लाटणे, तक्रारदाराला धमकावणे आणि प्रशासनाने मौन बाळगणे हा सगळा प्रकार संशयास्पद आहे. याप्रकरणी तात्काळ निष्पक्ष चौकशी होऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल,” असा इशारा आदिवासी सामाजिक संघटना व नागरिकांनी  दिला आहे.
         या प्रकरणाचे संपूर्ण पुरावे आहेत-सोळंके
नवसारी येथील आदिवासी वस्तीगृहामध्ये गृहप्रमुख पटेल यांनी केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात संपूर्ण पुरावे असून देखील आजवर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असून गृहप्रमुख तसेच गृहपाल यांना वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तसेच तक्रारदार संजय सोळंके यांनी केलेला आहे
        कोणताही भ्रष्टाचार नाही- गृहप्रमुख पटेल
 अनेक वर्षांपासून मी सेवेत आहे, मात्र मी स्वतःचा स्वार्थ कधीच बघितलेला नाही.नवसारी येथील वस्तीगृहात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार नसून सर्व आरोप तथ्यहीन आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांकडून मला कोणत्याही प्रकारची अद्याप विचारणा करण्यात आलेली नाही. त्यांनी याप्रकरणी माहिती मागितल्यास सर्व पुराव्यानिशी अधिकाऱ्यांना माहिती देणार असल्याचे गृहप्रमुख पटेल यांनी सांगितले.