खांबावरून पडून तरुण विज कर्मचारी ठार
नांदगाव पेठ एमआयडीसी मधील घटना
कर्मचारी व गावकऱ्यांमध्ये हळहळ
नांदगाव पेठ / प्रतिनिधी
नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या बाह्य स्त्रोत कर्मचारी वैभव इंगळे (वय २४) यांचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. भर पावसात खांबावर चढून काम सुरू असताना जनरेटरच्या रिव्हर्स प्रवाहामुळे खांबावरच करंट लागून ते खाली कोसळले. गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे तो सुरळीत करण्यासाठी महावितरणचे बाह्यस्रोत कर्मचारी वैभव इंगळे रा. डिगरगव्हाण हे तातडीने खांबावर चढून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते मात्र.कंपन्यांमध्ये असलेल्या मोठमोठ्या जनरेटरचा रिव्हर्स प्रवाह आल्यामुळे वैभव इंगळे यांना विजेचा मोठा झटका लागला आणि ते खाली कोसळले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वच कर्मचारी भयभीत झाले होते. खाली पडलेल्या वैभव इंगळे यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच वैभव इंगळे यांनी जगाचा निरोप घेतला होता.
वैभव इंगळे हे मूळचे डिगरगव्हाण येथील रहिवासी असून गेल्या वर्षीच त्यांचा विवाह झाला होता. या घटनेने नांदगाव पेठ एमआयडीसी सह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरणच्या कर्मचारी बांधवांतही शोककळा पसरली आहे. वीज कर्मचार्यांच्या जिवावर बेतणाऱ्या धोका-दायक कामाच्या परिस्थितीकडे यानिमित्ताने गंभीर लक्ष वेधले जात आहे.