तोतया पोलीस बनून लुबाडणूक करणारी ईराणी टोळी जेरबंद
अमरावती -
नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करत सोन्याचे दागिने घेऊन हातचलाखीने लंपास करणाऱ्या ईराणी टोळीचा अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या टोळीने अमरावतीसह महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश व बिहारसह विविध राज्यांत एकूण २५ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ सप्टेंबर रोजी एका ज्येष्ठ दाम्पत्याला अडवून पोलीस असल्याचे सांगून त्यांच्याकडील ७४ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. याच प्रकारची घटना त्याच दिवशी वरुड येथेही घडली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत बिड, ठाणे, कर्नाटक येथील चार आरोपी १) जहीर अब्बास ऊर्फ मोटा (बिड), २) लाला ऊर्फ गांधी समीर शेख (ठाणे), ३) वसीम शब्बीर ईराणी, ४) नझीर हुसेन अजीज अली (कर्नाटक), यांना देवगाव चौकात सापळा रचून अटक केली. आरोपींकडून एकूण २२१ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक चारचाकी वाहन, बनावट पोलीस ओळखपत्रे, प्रेस आयडी तसेच २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी अमरावती ग्रामीणमधील ९ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्यावर राज्यभरातील आणि इतर राज्यांतील २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी जहीर अब्बासवर उत्तर प्रदेशातील मंडी पो.स्टे. येथे १५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर आहे, तर दुसऱ्या आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याची माहिती आहे. पोलिसांचे आवाहन :- पोलीस कोणत्याही नागरीकांकडून त्यांच्या मौल्यवान वस्तू घेण्यास सांगत नाहीत. अशा कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास डायल ११२ किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला त्वरित माहिती द्यावी. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. किरण वानखडे, पोउनि. सागर हटवार यांच्या पथकाने केली.अमरावती ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची यशस्वी कारवाई