बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन
पोकरा महिला शेतीशाळा अंतर्गत ज्योती ठाकरे करीत आहेत प्रभावी महिला सक्षमीकरण
तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने यांचे नियोजन सर्वत्र होत आहे कौतुक
नांदगाव पेठ/प्रतिनिधी
हवामान बदलास अनुसरून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल तंत्रांचा वापर करून त्यांना शेती विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नरर्सिंगपूर येथे महिला शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पिक शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. पंकज चेडे यांचे विशेष मार्गदर्शन व तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने यांचे नियोजन लाभले. गावातील सहाय्यक कृषी अधिकारी सौ. ज्योती ठाकरे यांनी विशेष प्रात्यक्षिक व प्रशिक्षण घेतले.
हवामानातील बदलांचा थेट परिणाम पिकांवर होत असल्याने महिलांनी सक्षमपणे पीक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सुधारित वाणांचा वापर, पिकाचे नियमित निरीक्षण, पूर्वनियोजन तसेच वेळोवेळी कृषी सल्ला घेणे याबाबत शेतकरी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
मंडळ कृषी अधिकारी निता कवाणे यांनी हवामान बदलाचे स्वरूप, अतिवृष्टी, जास्त आद्रता, फुलगळ, फळधारणेतील अडथळे, कीड व रोग व्यवस्थापन तसेच उत्पादन घट याबाबत माहिती दिली. याशिवाय पीएमएफएमई योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योगावरही मार्गदर्शन करण्यात आले.
उप कृषी अधिकारी सौ. शुभांगी बोंडे व सहाय्यक कृषी अधिकारी सौ. ज्योती ठाकरे यांनी सोयाबीन पिकावर हवामानाचा परिणाम, जैविक व रासायनिक संरक्षणाचे उपाय, पीक व्यवस्थापन या विषयांवर चर्चा केली. महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले. महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.
या शेतीशाळेसाठी सहाय्यक कृषी अधिकारी सौ. दिप्ती मेटकर व श्री. चंद्रकांत खरबडे, प्रयोगशील शेतकरी महिला मनीषा नागोने, पोलीस पाटील सौ. सिमा गजानन निंभोरकर, कृषी ताई सौ. रंजना वानखडे, कृषी मित्र रवींद्र वानखडे यांचे सहकार्य लाभले.
शेतीशाळेला महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन पिकांबाबत निर्णय घेण्यासाठी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले.