तीन वर्षीय हरवलेल्या मुलीच्या पालकांचा शोध अवघ्या तीन तासात लावण्यात मंगरूळ चव्हाळा
पोलिसांना यश
नांदगाव खंडेश्वर -
दिनांक 06/09/2025 रोजी पोलीस स्टेशन मंगरूळ चव्हाळा हद्दीत समृद्धी महामार्गावर ट्रक चालक नामे मो.समीर मो.शब्बीर, रा. गडवारा, जि.प्रतापगड (उ.प्र.) हे त्यांचे वाहन घेऊन छत्रपती संभाजी नगर कडून नागपूरकडे जात असताना समृद्धी महामार्गावर त्यांना एक अंदाजे तीन वर्षाची मुलगी फिरत असताना मिळून आली. तिच्या सुरक्षितते करिता सदर ट्रक चालक यांनी तिला त्वरित पोलीस स्टेशन मंगरूळ चव्हाळा येथे आणले.
सदरची माहिती पो. स्टे मंगरूळ चव्हाळा प्रभारी अधिकारी स. पो. नी. श्री राजू हाके, यांनी मा. श्री. विशाल आनंद,पोलीस अधीक्षक अमरावती ग्रा. व श्री पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांना तात्काळ दिली असता घटनेचे गांभीर्य व संवेदनशीलता पाहता मा. पोलीस अधीक्षक,अमरावती ग्रा. यांनी स्था.गु.शा. तसेच पो.स्टे. मंगरूळ चव्हाळा येथील पोलीस पथक तयार करून मुलीच्या पालकांचा विना विलंब शोध घेणे करिता आदेशित केले होते. सदरची माहिती बालकल्याण समिती पदाधिकारी यांनासुद्धा देण्यात आली.
मुलींच्या पालकाचा शोध घेणे कामी मुलीचे वर्णन व मुलीचा फोटो पोलिसांनी त्वरित सोशल मीडिया द्वारे सर्वत्र प्रसारित केला तसेच मुलीच्या राहणीमानावरून परिसरातील गावे, तांडे, वस्त्या इ. ठिकाणी शोध घेतला तसेच शेजारील यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात सुद्धा सदर मुली बाबत माहिती देऊन तिच्या पालकांचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. एक पोलीस पथक समृद्धी महामार्गावरील टोलनाके तसेच समृद्धी महामार्गावरील येणारे जाणारे वाहने यांच्याकडे याबाबत विचारपूस करीत पाठविण्यात आले व समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर ही माहिती देण्यात आली व मुलगी हरविल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्वरित पोलिसांना संपर्क करण्याचे सूचित करण्यात आले. याच दरम्यान एक दांपत्य नामे शुभम पवार व सौ राधिका पवार रा.सुदर्शन नगर, जिल्हा वर्धा हे समृद्धी महामार्गावर मुलीच्या पालकांचा शोध घेत असलेल्या गणवेशातील पोलीस पथकाकडे आले व त्यांची मुलगी हरवलेली असल्याबाबत पोलिसांना माहिती दिली.
सदरचे दांपत्यास पोलीस स्टेशनला नेले असता त्यांनी त्यांच्या मुलीला व मुलीने त्यांना ओळखले. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ते त्यांचे कुटुंबीय हे दोन वाहनाने छत्रपती संभाजी नगर वरून वर्धा येथे जात असताना मंगरूळ चव्हाळा हद्दीत लघुशंखे करिता समृद्धी महामार्गावर थांबले. वाहनात प्रवाशांची संख्या खूप होती आणि सर्वच प्रवासी कुटुंबीय वाहनातून उतरले व लघुशंखे नंतर पुन्हा वाहनात बसले आणि वर्धेकरीता निघून गेले. काही वेळाने त्यांची तीन वर्षाची मुलगी कु. रुद्राक्षी ही सुद्धा वाहनातून खाली उतरली होती परंतु कुटुंबीयांच्या लक्षात न आल्याने ती वाहनात पुन्हा बसली नाही हे सर्वांना वर्धा येथे पोहोचल्यावर लक्षात आले. म्हणून तिच्या काळजीने तिचे आई वडील पुन्हा त्याच मार्गाने मुलीला शोधात परत आले व त्यावेळेस त्यांना पोलीस पथक समृद्धी महामार्गावर विचारपूस करताना मिळून आले आणि मुलगी पोलीस स्टेशनला असल्याबाबत कळाल्यावरून ते पोलीस स्टेशनला आले व मुलीला तिचे आई-वडील मिळाले.
बाल कल्याण समितीचे श्री.अभिजीत ठाकरे व श्रीमती छाया मुकाडे यांचे उपस्थितीत मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
लहान मुलीच्या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्य व संवेदनशीलता दाखवीत तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे अवघ्या तीन तासात बाल कल्याण समिती सदस्यांच्या माध्यमातून तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करता येणे शक्य झाले आहे.