धडाकेबाज कारवाई : नांदगावपेठ पोलिसांनी पकडला २१ लाखांचा पोर्टिफाईड तांदूळ
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याच्या अवैध वाहतुकीवर कारवाई – तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नांदगाव पेठ / प्रतिनिधी
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील धान्याची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांविरोधात नांदगावपेठ पोलिसांनी मंगळवारी मोठी कारवाई केली. काटेकोर तपास आणि जलद प्रतिसाद देत पोलिसांनी पोर्टिफाईड तांदळाने भरलेला ट्रक पकडत तब्बल २१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या धाडसी कारवाईने धान्य तस्करी करणाऱ्या रॅकेट्समध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांना एका ट्रकमधून पोर्टिफाईड तांदूळ अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी, अमरावती ग्रामीण यांना कळवून संयुक्तरीत्या पाहणी केली. पंचासमक्ष पंचनामा करून २४० क्विंटल पोर्टिफाईड तांदूळ किंमत सुमारे ६ लाख रुपये आणि ट्रक क्र. एमएच-३० बीडी-१५९९ किंमत सुमारे १५ लाख रुपये असा एकूण २१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहनचालक शिवशंकर ओंकार तायडे (रा. अकोला) आणि हमाल राजेश सोनोने (रा. अकोला) यांनी चौकशीत हा तांदूळ अमोल महल्ले (रा. भातकुली) यांच्या गोदामातून घेऊन वडसा, जि. गडचिरोली येथे नेत असल्याचे सांगितले. त्यांच्या जवळ ‘बालाजी ट्रेडर्स’चे बिल सापडले. प्राथमिक चौकशीत संबंधित तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील असल्याचा संशय बळावला त्यामुळे प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी अमोल महल्ले, शिवशंकर तायडे आणि राजेश सोनोने यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अंतर्गत नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सदर कारवाई पुरवठा विभाग अमरावती ग्रामीण व नांदगावपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, सपोआ कैलास पुंडकर (फ्रेजरपुरा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात पार पडली.या मोहिमेत निरीक्षक अधिकारी चैताली यादव, पोहेकॉ राजाभाऊ राऊत, पोकों राजीक खान, निलेश साविकार, राजा सय्यद, वैभव तिखीले आणि अमित ढोले यांनी सहभाग घेतला.या कारवाईमुळे अमरावती परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.