नांदगाव खंडेश्वर - तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर - नियमीत करावयाची नालेसफाई नगर पंचायतने गेल्या कित्येक महिन्यापासुन केली नसल्याने कुरेशी लोकवस्तीतील सर्वच नाले तुंबलेले आहेत. डेंग्यूच्या साथीत बाकीच्या साथरोगांची भर पडण्याची नगर पंचायत प्रशासन वाट पाहत आहेत की काय, तर जोरदार पाऊस आल्यावर नाल्यातील कचरा वाहून गेल्यावर बिले सादर करण्याची ठेकेदार वाट पाहतो का असा सवाल नागरिक उपस्थीत करित असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
प्रभाग क्रमांक १४ च्या कुरेशी लोकवस्तीतील बहुतेक वसाहतींतून नाले वाहतात. या नाल्यांची साफसफाई न केल्यास आसपासच्या परिसरात राहणा-या नागरिकांच्या जिवावर बेतण्याची वेळ येते.
दरवर्षी तुंबलेल्या नाल्यांमुळे वसाहतींत पाणी जाण्याचे प्रकार तर घडतातच, पण नाल्यात असणा-या कच-यामुळे रोगराईचे प्रमाण झपाट्याने वाढते. नियमीत नाल्यांची सफाई करने गरजेचे असतांना ठेकेदारांकडुन थातूरमातूर कामे करून नाल्यातील कचरा फोटो काढून बिल सादर करत बिले उचलतात. ही आजपर्यंतची परंपरा नगर पंचायतची आहे.
आता मात्र त्या परंपरेला मोडित काढुन या गैरप्रकाराकडे आता विशेष लक्ष्य देण्यात येणार आहे.
मशहरातील एकाही नाल्याची सफाई करण्यात आलेली नाही. कुरेशी लोकवस्तीतील परिसरात येणारे सर्वच नाल्याच्या पात्रात कच-याचे ढीग साचले आहेत. कच-याच्या ढिगाने पात्रच व्यापले आहे. कचरा तुंबल्याने पाणी वाहणे अशक्य बनले आहे.
विशेष म्हणजे शेजारच्या नाल्यातही हीच स्थिती असून नगर पंचायत प्रशासनाचे जानिव पुर्वक या लोक वस्तीकडे दुरलक्ष्य तर नाही ना असा सवाल उपस्थीत केला जात आहे, कुरेशीचे आसपासच्या नाल्याची अवस्था अशीच असून कच-यामुळे नाल्यांचे पात्र उथळ बनले आहे. या मुळे नागरिकांचे आरोग्यास धोका आहे.
नागरिकांचे जीव घेणार का?
याबाबत तातडीने कारवाई करण्याची गरज असून काम न करता नालेसफाईची बिले उचलल्यास आम्हाला आमच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल. नालेसफाईवर मोठा खर्च नगर पंचायत करते, पण जशी पाहिजे तशी साफ सफाई कुठेच दिसत नाही.
रोगराईचा धोका वाढत असताना नगर पंचायत प्रशासन आता काय नागरिकांचे जीव घेणार का, असा सवाल नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने यांनी केला आहे.
रोगराईचा धोका वाढला
नाल्यामधील कचरा गेल्या कित्येक महिण्यापासुन कुजायला सुरुवात झाली असून सर्वच ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. साफसफाई न झाल्याने या भागांत आता आजारपणाला निमंत्रण मिळाले आहे. आधीच डेंग्यूसारख्या नविन नविन साथीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.त्यात आता इतर आजारांचा धोका वाढला आहे.
या समस्येची तातडीने दखल घेऊन प्रभाग क्रमांक १४ तील कुरेशी वस्तीतील सर्व नाल्यांची व गटारांची लवकरात लवकर साफसफाई करावी आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करावी. अशी मागणी एका निवेदनाव्दारे नगरसेविका - सौ.प्रांजली राहुल गुल्हाने यांनी मुख्याधिकारी नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर यांना केली आहे.