रेल्वे लाईन पलीकडील भागाचा पाणीप्रश्न सुटणार; नगराध्यक्ष हर्षल साबळे यांची तातडीने रेल्वे प्रशासनाकडे धाव

रेल्वे लाईन पलीकडील भागाचा पाणीप्रश्न सुटणार; नगराध्यक्ष हर्षल साबळे यांची तातडीने रेल्वे प्रशासनाकडे धाव

मुर्तिजापूर ( तालुका प्रतिनिधी )
मुर्तिजापूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ०२ मधील जुनी वस्ती आणि रेल्वे पटरीच्या पलीकडील भागात गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या आता लवकरच निकाली निघणार आहे. या भागातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी नगराध्यक्ष हर्षल रामेश्वर साबळे यांनी पुढाकार घेतला असून, रेल्वे प्रशासनाशी तातडीने पत्रव्यवहार केला आहे.
दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी नगराध्यक्ष हर्षल साबळे यांनी पाणीपुरवठा व जलनिस्तारण सभापती राहुलजी गुल्हाने आणि स्थानिक नगरसेविका यांच्यासह प्रत्यक्ष या भागाची पाहणी केली. रेल्वे पटरीमुळे पाईपलाईन टाकणे आणि दुरुस्तीच्या कामात मोठ्या तांत्रिक अडचणी येत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत.
आमदार हरिषभाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून पाईपलाईनची साफसफाई आणि आवश्यक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. नागरिकांची गैरसोय दूर करणे हेच आमचे प्राथमिक ध्येय असल्याचेही हर्षल साबळे यांनी यावेळी नमूद केले.
या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून पाण्यासाठी हाल सोसणाऱ्या जुनी वस्तीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.