प्रामाणिकपणाचा विजय! दुरांतो एक्सप्रेसमधील अटेंडंटने परत केले पैशांचे पाकीट; अमरावती एसीबीच्या कर्मचाऱ्याला दिला दिलासा

प्रामाणिकपणाचा विजय! दुरांतो एक्सप्रेसमधील अटेंडंटने परत केले पैशांचे पाकीट; अमरावती एसीबीच्या कर्मचाऱ्याला दिला दिलासा 
अमरावती:
धावपळीच्या युगात आजही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दर्शन 'मुंबई-बडनेरा दुरांतो एक्सप्रेस'मध्ये घडले आहे. रेल्वेतील अटेंडंट अनिकेत अलोने याने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कर्मचाऱ्याला त्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज आणि रोख रक्कम सुखरूप परत मिळाली आहे.
नेमकी घटना काय?
अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. अशोक पराते हे ११ मार्च २०२६ रोजी १२८९० दुरांतो एक्सप्रेसने मुंबईहून बडनेऱ्याला परत येत होते. प्रवासादरम्यान, बडनेरा स्थानकावर उतरताना त्यांचे पैशांचे पाकीट नजरचुकीने रेल्वेच्या B-4 कोचमध्येच राहिले. या पाकिटात ६००० रुपये रोख, काही वैयक्तिक आणि अत्यंत महत्त्वाची कार्यालयीन कागदपत्रे होती.
अनिकेतचा प्रामाणिकपणा
गाडी रिकामी होत असताना कोच अटेंडंट अनिकेत अलोने (रा. वर्धा) याला हे पाकीट सापडले. पाकिटातील कागदपत्रांची संवेदनशीलता ओळखून अनिकेतने तात्काळ संपर्क साधून ते पाकीट श्री. पराते यांना सन्मानाने परत केले. आजच्या काळात जिथे पैशांसाठी माणूस नाती विसरतो, तिथे अनिकेतने दाखवलेली ही तत्परता आणि सचोटी कौतुकास्पद ठरली आहे.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव
अनिकेतच्या या कार्याबद्दल श्री. अशोक पराते, श्री. राहुल वंजारी (एसीबी, अमरावती) आणि दीपक चौरपगार यांनी प्रत्यक्ष भेटून त्याचे आभार मानले. तसेच, अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून अनिकेतच्या प्रामाणिकपणाचे भरभरून कौतुक केले जात आहे.