पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; दगड धानोरा येथील महसूल अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी नेर परसोपंत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात व्हॉट्सअँप स्टेटसद्वारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी, नेर तालुक्यातील दगड धानोरा येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) निमगडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने नायब तहसीलदार यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, निमगडे यांनी आपल्या वैयक्तिक मोबाईलवरून देशाच्या व राज्याच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तींचा अवमान करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. सरकारी पदावर कार्यरत असताना अशा प्रकारचे कृत्य करणे हे सेवा नियमांचे उल्लंघन असून यामुळे जनभावनेत संताप व्यक्त होत आहे. यावेळी नायब तहसीलदारांना निवेदन देताना भाजप शहराध्यक्ष आशिष खोडे, महिला आघाडीच्या पदाधिकारी व नगरसेविका महिला व बालकल्याणउ .सभापती सोनालीताई गुल्हाने, राजेश गुगलिया, राजेंद्रजी निघोट, अतुल कावरे, श्याम ठाकरे, गौरव राऊत यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्याची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.