नांदगाव खंडेश्वर:
सोशल मीडियाचा वापर विधायक कामांसाठी होणे अपेक्षित असताना, काही समाजकंटकांकडून त्याचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. नांदगाव खंडेश्वर येथील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी स्थानिक रहिवासी समीर अनिस खान यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
समीर खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवरील एका ग्रुपमध्ये 'ट्रिपल एक्स' (XXX) नावाच्या लिंकवरून काही अज्ञात व्यक्तींनी अत्यंत अश्लील आणि नग्न फोटो-व्हिडिओ पोस्ट केले. ही लिंक ओपन केल्यानंतर समोर आलेला प्रकार धक्कादायक होता.
या कृत्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असून, ग्रुपमधील महिला आणि लहान मुलांच्या मनावर याचे अत्यंत विपरीत परिणाम होऊ शकतात, अशी भीती खान यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी या अश्लील पोस्टचे स्क्रीनशॉट्स पुराव्यादाखल पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून विकृती पसरवणाऱ्या अशा अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समीर खान यांनी पोलीस निरीक्षक, नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे. आता पोलीस या प्रकरणी काय पावले उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.