शबरी आवास योजनेचे शेकडो प्रस्ताव धारणी कार्यालयात धूळखात; नगराध्यक्षांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष
नांदगाव खंडेश्वर -
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत अंतर्गत शबरी आवास योजनेचे शेकडो प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून धारणी प्रकल्प कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. यामुळे पारधी आणि आदिवासी समाजातील अनेक गरजू लाभार्थी हक्काच्या घरापासून वंचित असून, या गंभीर प्रश्नाकडे नगराध्यक्षा सौ. प्राप्ती मारोटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
नगराध्यक्षा प्राप्ती मारोटकर आणि नगर पंचायत गटनेते प्रकाश मारोटकर यांनी लाभार्थ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. शबरी आवास योजनेचे प्रस्ताव 'लक्षांक' नसल्याचे कारण सांगून धारणी प्रकल्प कार्यालयाने रोखून धरले आहेत. मात्र, हे घरकुल 'पारधी पॅकेज'मधून मंजूर करता येणे शक्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पारधी पॅकेजच्या आराखडा बैठकीत यावर सकारात्मक निर्णय झाल्यास लाभार्थ्यांना न्याय मिळेल, असे मत गटनेते प्रकाश मारोटकर यांनी यावेळी व्यक्त केले.
शहरातील इतर समस्यांचाही पाढा वाचला
या भेटीदरम्यान केवळ घरकुलच नव्हे, तर शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन: शहरासाठी प्रस्तावित कचरा प्रकल्पाचे काम मार्गी लावणे.
- पंतप्रधान आवास योजना: या योजनेतील लाभार्थ्यांचे थकीत अनुदान तात्काळ वितरित करणे.
- विकास निधी: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान, पर्यावरण, पर्यटन आणि जिल्हा वार्षिक नियोजनातील रस्ते व इतर विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देणे.
- नागरी वस्ती सुधारणा: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजने अंतर्गत प्रलंबित कामे पूर्ण करणे.
- यावेळी पारधी समाज संघटनेचे सूरज पवार, बंटी भोसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने या प्रस्तावांकडे तातडीने लक्ष देऊन गरिबांच्या घरांचा आणि शहराच्या विकासाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.