नांदगाव खंडेश्वर:
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्षपदी तरुण आणि तडफदार नेतृत्व समीर पाटील (दहातोंडे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून, पाटील यांनी पदभार स्वीकारताच पक्षातील गटबाजी आणि छुप्या युतीवर जोरदार प्रहार केला आहे.
"जे लोक काँग्रेस पक्षात राहून विरोधी पक्षांशी जवळीक साधतात आणि पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करतात, अशांना आता पक्षात स्थान नाही. अशा गद्दारांना त्यांची योग्य जागा दाखवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही," अशा कडक शब्दांत समीर पाटील यांनी विरोधकांना आणि पक्षांतर्गत फितुरांना इशारा दिला आहे.
पक्षाची पुनर्बांधणी हेच ध्येय
समीर पाटील पुढे म्हणाले की, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेईल. आमचे नेते मा.आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणे आणि राहुल गांधी यांचे विचार घराघरांत पोहोचवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल. तालुक्यातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या निवडीबद्दल समीर पाटील यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.