विशेष बातमी: अमरावती ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी 'शूर' आयपीएस निकेतन कदम यांची नियुक्ती

विशेष बातमी : अमरावती ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी 'शूर' आयपीएस निकेतन कदम यांची नियुक्ती
                                                              अमरावती :
अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या नव्या पोलीस अधीक्षकपदी आयपीएस निकेतन बी. कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत इथपर्यंत पोहोचलेले आणि आपल्या कर्तव्यनिष्ठेसाठी ओळखले जाणारे निकेतन कदम आता अमरावती जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील एका मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या निकेतन कदम यांनी आयटी क्षेत्रातली नोकरी सोडून आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
 मार्च २०२५ मध्ये नागपुरात ( DCP Zone 5 असताना ) महाल परिसरात झालेल्या हिंसाचारादरम्यान अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाला होता. या गंभीर दुखापतीतून सावरून ते पुन्हा एकदा जनसेवेसाठी सज्ज झाले आहेत.
या आधी त्यांनी लातूर येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि नागपुरात पोलीस उपआयुक्त (DCP) म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे.
जिल्ह्यासाठी काय बदलणार?
निकेतन कदम यांच्या नियुक्तीमुळे अमरावती ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर वचक निर्माण होईल आणि गुन्हेगारी नियंत्रणास मोठी मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास प्रशासनाला आहे.