लोणी-मोरगाव रस्त्याची दुरवस्था; तातडीने डांबरीकरण करण्याची समीर पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी

लोणी-मोरगाव रस्त्याची दुरवस्था; तातडीने डांबरीकरण करण्याची समीर पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी

नांदगाव खंडेश्वर: तालुक्यतील लोणी ते मोरगाव या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली असून, हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्यापारी खरेदी-विक्री संस्था, नांदगाव खंडेश्वरचे कार्यप्रमुख तथा तालुका काँग्रेस समितीचे नेते समीर पाटील (दहातोंडे) यांनी जिल्हा परिषद, अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने डांबरीकरणाची मागणी केली आहे.
लोणी ते मोरगाव हा मार्ग परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, सध्या या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता शोधण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या रस्त्याचा वापर शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर करतात. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, गंभीर परिस्थितीत रुग्णवाहिका नेणेही कठीण झाले असून रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप समीर पाटील यांनी निवेदनातून केला आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन लोणी ते मोरगाव रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरून सर्वसामान्यांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी आग्रही मागणी समीर पाटील यांनी केली आहे.