नांदगाव खंडेश्वरची कन्या कु. नयना सुरेश वानखडे हिची नागपूर पोलीस दलात शिपाई पदी निवड; मातंग समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा !
नांदगाव खंडेश्वर :
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर सामान्यातील सामान्य माणूसही आभाळाला गवसणी घालू शकतो, हे नांदगाव खंडेश्वर येथील कु. नयना सुरेश वानखडे हिने सिद्ध करून दाखवले आहे. अण्णाभाऊ साठे चौक येथील रहिवासी असलेल्या आणि मातंग समाजातील एका सर्वसामान्य कुटुंबातील नयनाची नागपूर पोलीस दलात 'पोलीस शिपाई' पदी निवड झाली असून, तिच्या या यशाने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
नयनाचे आई वडील सुरेश वानखडे हे अत्यंत कष्टाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती बेताची असली तरी, नयनाने कधीही आपल्या ध्येयापासून पाय मागे घेतले नाहीत. पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे तिचे स्वप्न होते. यासाठी तिने शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेचा कसून सराव केला होता. तिच्या या यशात तिच्या आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
नयनाच्या या निवडीबद्दल मातंग समाजातर्फे आणि अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील नागरिकांकडून तिचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
नयनावर सध्या सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.