नांदगाव खंडेश्वर: धुळीच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अदानी गॅस कंपनीला ९० हजारांचा दंड; नगरसेविका प्रांजली गुल्हाने यांच्या पाठपुराव्याला यश

नांदगाव खंडेश्वर : धुळीच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अदानी गॅस कंपनीला ९० हजारांचा दंड; नगरसेविका प्रांजली राहुल गुल्हाने यांच्या पाठपुराव्याला यश

नांदगाव खंडेश्वर: शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम करणाऱ्या अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीला धुळीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने नगर पंचायतीने ९० हजार रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. नगरसेविका प्रांजली राहुल गुल्हाने यांनी या समस्येबाबत प्रशासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कडक कारवाई करण्यात आली आहे.
शहरात पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू असताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, नगर पंचायतीने ६ एप्रिल २०२६ रोजी कंपनीला नोटीस बजावली होती. मात्र, महिना उलटूनही कंपनीने कोणतीही उपाययोजना केली नाही. 
अखेर मुख्याधिकाऱ्यांनी ७ मे २०२६ रोजी आदेश काढून, दररोज ३,००० रुपये याप्रमाणे एका महिन्याचा एकूण ९०,००० रुपये दंड कंपनीवर आकारला आहे.
काय आहेत मुख्याधिकाऱ्यांचे आदेश ?

▪ दंडाची रक्कम २ दिवसांच्या आत नगर पंचायत कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे.
  • कामाच्या ठिकाणी दिवसातून किमान ३-४ वेळा पाण्याची फवारणी करावी.
  • साचलेली माती त्वरित झाकण्यात यावी आणि जास्तीची माती शहराबाहेर हलवावी.
  • विहित मुदतीत दंडाचा भरणा न केल्यास आणि प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न राबवल्यास काम थांबवून कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही नगर पंचायतीने दिला आहे. नगरसेविका प्रांजली राहुल गुल्हाने यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले असून, नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.