एकाच छताखाली दोन मोठे अधिकारी; अदानी गॅसचे व्यवस्थापक आणि मुख्याधिकाऱ्यांच्या ‘गुफ्तगू’ची नांदगावात जोरदार चर्चा!

 एकाच छताखाली दोन मोठे अधिकारी; अदानी गॅसचे व्यवस्थापक आणि मुख्याधिकाऱ्यांच्या ‘गुफ्तगू’ची नांदगावात जोरदार चर्चा!

नांदगाव खंडेश्वर :
शहरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या एका अनोख्या विषयाची चांगलीच जाहीर चर्चा रंगली आहे. अदानी टोटल गैस लिमिटेड (अमरावती) या नामांकित कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतचे मुख्याधिकारी हे दोन्ही जबाबदार अधिकारी एकाच इमारतीमध्ये वेगवेगळ्या सदनिकांमध्ये वास्तव्यास आहेत. एकाच इमारतीत राहत असल्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये रोजच्या भेटीगाठी आणि विविध विषयांवर आपसात खलबते होत असल्याची जोरदार चर्चा आता जनमानसात पसरली आहे.
🤫 शेजारी-शेजारी वास्तव्यामुळे चर्चांना उधाण
शासकीय यंत्रणेचा कणा असलेले नगर पंचायतचे मुख्याधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील बलाढ्य मानल्या जाणाऱ्या अदानी गॅस कंपनीचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक हे एकाच बिल्डिंगमध्ये राहत असल्याचा योगायोग सध्या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहत असले तरी, सकाळी-संध्याकाळी होणाऱ्या भेटी, अनौपचारिक गप्पा आणि त्यांच्यातील वाढत्या संवादाकडे आता नागरिक मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत.
💼 गप्पांच्या फडात नेमके शिजतेय काय?
अदानी गॅस पाइपलाइनचे जाळे आणि नगर पंचायत क्षेत्रातील नागरी विकास कामे यांचा कुठेतरी ताळमेळ तर लावला जात नाही ना? अशी शंका काही जागरूक नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. तर दुसरीकडे, हा केवळ एक निव्वळ योगायोग असून शेजारी म्हणून त्यांच्यात सामान्य चर्चा होत असावी, असाही एक सूर आहे. मात्र, दोन्ही वरिष्ठ अधिकारी एकत्र राहत असल्याने त्यांच्यात नेमकी काय चर्चा चालते, यावरून नांदगाव खंडेश्वरच्या कट्ट्यांवर तर्क-वितर्कांना ऊत आला आहे.