गाळेधारकांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार; नगरसेवक रोनित गुल्हाने यांचा निर्धार


गाळेधारकांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार; नगरसेवक रोनित गुल्हाने यांचा निर्धार

दारव्हा - 
शहरातील पोलिस स्टेशनसमोरील जुन्या दुकानांच्या जागी नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारताना, पूर्वीचे नगराध्यक्ष मा. हरिभाऊ गुल्हाने यांनी सर्व जुन्या गाळेधारकांना प्रथम प्राधान्य देऊन आपला शब्द पाळला होता. त्याच भूमिकेतून आजही जुन्या गाळेधारकांना न्याय मिळावा आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अटींवर त्यांना दुकाने मिळावीत, या मागणीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा ठाम निर्धार नगरसेवक रोनित हरिभाऊ गुल्हाने यांनी व्यक्त केला आहे. आमची भूमिका कालही तीच होती आणि आजही तीच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, शहरात सध्या सुरू असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर जुन्या गाळेधारकांच्या हक्काचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माजी नगराध्यक्ष मा. हरिभाऊ गुल्हाने यांच्या कार्यकाळातील उदाहरणाचा दाखला देत नगरसेवक रोनित गुल्हाने यांनी गाळेधारकांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. तत्कालीन प्रशासनाने स्वतः जातीने लक्ष घालून जुन्या व्यापाऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.
जुन्या गाळेधारकांवर कोणताही अन्याय होऊ नये, त्यांना नवीन कॉम्प्लेक्समध्ये प्राधान्याने दुकाने मिळावीत आणि लिलावाच्या अटी सर्वसामान्य व्यापाऱ्यांना परवडणाऱ्या असाव्यात, अशी मागणी नगरसेवक रोनित गुल्हाने यांनी केली आहे. या न्याय्य मागणीसाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांना रीतसर निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्यासाठी लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संबंधित मंत्रालयातील मंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन सादर केले जाणार आहे.
शहरातील छोट्या आणि जुन्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये आणि त्यांच्या रोजगाराचा साधन हिरावले जाऊ नये, यासाठी हा लढा असून गाळेधारकांना न्याय मिळेपर्यंत आपली हीच भूमिका राहील, असा विश्वास नगरसेवक रोनित गुल्हाने यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधताना दिला.