नाशिकमध्ये घुमतोय नागपूरच्या कर्तृत्वाचा डंका ; बांधकाम व्यावसायिक प्रांजली गुल्हाने यांना 'महाराष्ट्र उद्योग रत्न' पुरस्कार प्रदान !

नाशिकमध्ये घुमतोय नागपूरच्या कर्तृत्वाचा डंका ; बांधकाम व्यावसायिक प्रांजली  गुल्हाने यांना 'महाराष्ट्र उद्योग रत्न' पुरस्कार प्रदान !

नांदगाव खंडेश्वर :
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करू शकतात, हे नागपूरच्या सौ. प्रांजली सचिन गुल्हाने यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आजही पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या बांधकाम व्यवसायात (Real Estate) आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवल्याबद्दल, नाशिक येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते त्यांना "महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार २०२६" देऊन गौरविण्यात आले.
असा आहे यशस्वी प्रवास:
गणोजा देवी येथील श्री. सुधाकरराव गाडबैल यांच्या कन्या आणि नागपूरच्या एस.सी.एस. गर्ल्स कॉलेजचे प्राध्यापक सचिन मधुकरराव गुल्हाने यांच्या पत्नी असलेल्या प्रांजली ताईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. पतीच्या खंबीर पाठिंब्यामुळे आणि स्वतःच्या आत्मविश्वासाने त्यांनी 'स्पृहा कुसुम', 'स्पृहासिंधू', 'स्पृहा एन्क्लेव्ह', 'स्पृहा एक्झोटीका', 'स्पृहा पार्क व्ह्यू', 'स्पृहा एलेगन्स' आणि 'स्पृहा एमराल्ड' यांसारख्या भव्य गृहप्रकल्पांची (Flat Schemes) यशस्वी निर्मिती केली आहे.
पुरस्कारांची मोहोर:
प्रांजली गुल्हाने यांच्या कार्याची दखल यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी त्यांना NAREDCO या प्रतिष्ठित संस्थेकडून 'नागपूरमधील उत्कृष्ट महिला बांधकाम व्यावसायिक' म्हणून सन्मानित करण्यात आले होते. आता 'महाराष्ट्र उद्योग रत्न' मिळाल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
समाजातून कौतुकाचा वर्षाव:
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांच्यासह समस्त आप्तेष्ट, नातेवाईक आणि हितचिंतकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. "बांधकाम क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक पारदर्शकता आणणे, हेच माझे पुढील ध्येय आहे," असे प्रतिपादन प्रांजली गुल्हाने यांनी यावेळी केले.