नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीचा मनमानी कारभार; चालू टँकर 'नादुरुस्त' दाखवून नागरिकांना पाण्यापासून ठेवले वंचित!

नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीचा मनमानी कारभार; चालू टँकर 'नादुरुस्त' दाखवून नागरिकांना पाण्यापासून ठेवले वंचित! 
▪ नगरसेविका प्रांजली गुल्हाने यांचा प्रशासनाला थेट सवाल; कायदेशीर कारवाईसह तीव्र आंदोलनाचा इशारा   
नांदगाव खंडेश्वर :
पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असताना, नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत प्रशासनाकडून नागरिकांची उघड दिशाभूल केली जात असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी केला आहे. नगर पंचायतीचा पाणी पुरवठा करणारा टँकर पूर्णपणे सुस्थितीत असतानाही, केवळ 'टँकर नादुरुस्त आहे' असे खोटे कारण पुढे करून नागरिकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गुल्हाने यांनी प्रशासनाला थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
संविधानाचा दाखला देत प्रशासनाला घेरले
या संदर्भात जाहीर सवाल उपस्थित करताना नगरसेविका प्रांजली गुल्हाने म्हणाल्या की, "भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ (जगण्याचा अधिकार) अंतर्गत प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. तसेच, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ नुसार जनतेला मूलभूत सुविधा पुरवणे हे नगरपंचायतीचे कायदेशीर कर्तव्य आहे. असे असताना, टँकर चांगला असूनही तो कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या इशाऱ्यावर थांबवून ठेवण्यात आला आहे? याचा उत्तर प्रशासनाने द्यावे."
कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी
कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि खोटे बोलून जनतेला वेठीस धरणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांचा समाचार घेताना त्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रवृत्तींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांतर्गत कडक शिस्तभंगविषयक कायदेशीर कारवाई होऊ शकते. शासकीय मालमत्ता सुस्थितीत असताना तिचा वापर जनहितासाठी न करणे हा थेट जनतेच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीने या प्रकरणी तात्काळ सुधारणा करून माझे प्रभागासह सर्वीकडचा पाणी पुरवठा सुरळीत केला नाही, तर तीव्र कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रभाग क्रमांक १४ नगर पंचायत नांदगाव खंडेश्वरच्या नगरसेविका  सौ. प्रांजली गुल्हाने यांनी दिला आहे. "आम्ही जनतेच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी शेवटपर्यंत लढण्यास कटिबद्ध आहोत," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या जाहीर पवित्र्यामुळे आता नगर पंचायत प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण नांदगाववासीयांचे लक्ष लागले आहे.