अदानी गॅस पाईपलाईनवर कार्यरत असलेल्या मजुराचा संशयास्पद मृत्यू ; आर्थिक मदतीसाठी नगरसेविका प्रांजली गुल्हाने आक्रमक

अदानी गॅस पाईपलाईनवर कार्यरत असलेल्या मजुराचा संशयास्पद मृत्यू ; आर्थिक मदतीसाठी नगरसेविका प्रांजली गुल्हाने आक्रमक

नांदगाव खंडेश्वर:
अदानी कंपनीच्या सी.एन.जी. गॅस पाईपलाईन प्रकल्पावर चौकीदार म्हणून कार्यरत असलेल्या एका मजुराचा कर्तव्यावर असतानाच संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पुंडलीकराव रुमने (वय अंदाजे ५५-६० वर्षे) असे मृत कामगाराचे नाव असून, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी पुढाकार घेतला आहे.
नेमकी घटना काय ?
मिळालेल्याॉ माहितीनुसार, नांदगाव खंडेश्रर येथील जिरीपुरा येथील रहिवासी असलेले पुंडलीकराव रुमने हे  मागील दीड वर्षांपासून अदानी कंपनीच्या कंत्राटदाराकडे चौकीदार म्हणून काम करत होते.नांदगाव खंडेश्वर येथील घोडेश्वार यांचे बंद पडलेला ढाबा जो सदर कंपनीने साहित्य ठेवण्यासाठी भाड्याने घेतला आहे. त्या ढाब्यावरील खोलीत राहून ते कंपनीच्या साहित्याची राखण करण्याची जबाबदारी सांभाळत होते. मात्र, दिनांक ५ मे २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास कर्तव्यावर असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ते संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.
कुटुंबाचा आधार हरवला:
मयत पुंडलीकराव हे घरातील एकमेव कर्ते पुरुष होते. मजुरी करून ते आपल्या पत्नी आणि मुलाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अचानक जाण्याने रुमने कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांच्यासमोर भविष्यातील उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
नगरसेविकांची प्रशासनाकडे धाव:
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर पंचायत नांदगाव खंडेश्वरच्या नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी प्रशासनाला लेखी मागणी पत्र सादर केले आहे. " कामगार कंपनीच्या प्रकल्पासाठी काम करत असताना ही घटना घडली आहे, त्यामुळे कामगार कल्याण कायद्यानुसार कंपनीने या कुटुंबाला तत्काळ सानुग्रह मदत (Compensation) द्यावी," अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली आहे. तसेच, शासकीय नियमानुसार मिळणारी इतर मदतही कुटुंबाला लवकरात लवकर मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
आता अदानी कंपनी आणि संबंधित कंत्राटदार या पीडित कुटुंबाला किती लवकर आर्थिक आधार देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.