नांदगाव खंडेश्वर येथे अदानी गॅस पाईपलाईनवरील चौकीदाराचा संशयास्पद मृत्यू; आर्थिक मदतीसाठी तहसीलदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

नांदगाव खंडेश्वर येथे अदानी गॅस पाईपलाईनवरील चौकीदाराचा संशयास्पद मृत्यू; आर्थिक मदतीसाठी तहसीलदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

नांदगाव खंडेश्वर:
येथील अदानी कंपनीच्या सी.एन.जी. गॅस पाईपलाईन प्रकल्पावर कार्यरत असलेले चौकीदार पुंडलीकराव रुमने यांचा कर्तव्यावर असताना संशयास्पद मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे रुमने यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून, त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने थेट अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे.
कर्तव्यावर असतानाच घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव खंडेश्वर येथील वॉर्ड क्र. १३ (जिरीपुरा) येथील रहिवासी असलेले पुंडलीकराव रुमने हे मागील दीड वर्षांपासून अदानी कंपनीच्या कंत्राटदाराकडे चौकीदार म्हणून प्रामाणिकपणे सेवा देत होते. मात्र, दि. ५ मे २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास कर्तव्यावर असतानाच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पुंडलीकराव हे कुटुंबातील एकमेव कमावते पुरुष होते. त्यांच्या या अकाली निधनामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून संपूर्ण कुटुंब प्रचंड आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहे.
नगरसेविकेच्या पाठपुराव्याला यश
या संवेदनशील प्रकरणात नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर येथील नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी ७ मे २०२६ रोजी तहसीलदार कार्यालयाला पत्र लिहून पीडित कुटुंबाची व्यथा मांडली होती. हा कामगार कंपनीच्या प्रकल्पावर कार्यरत असतानाच ही घटना घडल्यामुळे, कंपनीच्या नियमांनुसार आणि कामगार कल्याण कायद्यांतर्गत रुमने यांच्या कुटुंबाला तातडीने सानुग्रह आणि आर्थिक मदत मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते.
नगरसेविका सौ. गुल्हाने यांच्या पत्राची गंभीर दखल घेत तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांनी अमरावतीचे माननीय जिल्हाधिकारी आणि 'अदानी टोटल लिमिटेड'चे व्यवस्थापक यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार (क्र.स.म.अ.ने.आ./कावि ८७३/२०२६, दि. १४.५.२०२६) केला आहे. सदर अर्ज पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला असून, संबंधित अदानी कंपनीला त्यांच्या स्तरावरून पीडित कुटुंबाला तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेशित करावे, अशी विनंती तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आता प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून, अदानी कंपनी यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.