नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचा कारभार रामभरोसे; जिल्हाधिकाऱ्यांच्या दणक्यानंतर मुख्याधिकाऱ्यांचे धाबे दणाणले !
स्वच्छता आणि आरोग्य सेवेचा बोजवारा ; सभापती ज्योत्सना धवसे यांच्या तक्रारीवर मंत्रालयीन पातळीवरून मोठी कारवाई !
नांदगाव खंडेश्वर (प्रतिनिधी) स्थानिक नगरपंचायत प्रशासनाचा मनमानी आणि सुस्त कारभार आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रडारवर आला आहे. शहरात स्वच्छता आणि आरोग्य सेवांचा पुरता बोजवारा उडालेला असतानाही झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी अखेर स्वच्छता व आरोग्य सभापती तथा काँग्रेस गटनेत्या सौ. ज्योत्सना अमोल धवसे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीचे ‘ब्रह्मास्त्र’ उपसले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने मुख्याधिकाऱ्यांना ‘उलट टपाली’ (तात्काळ) अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने नगरपंचायत वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. अधिकाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कारवाई शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
नेमके प्रकरण काय ? गेल्या काही महिन्यांपासून नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत हद्दीत कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या आणि आरोग्य सेवांमधील कमालीचे दुर्लक्ष यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. वारंवार सांगूनही प्रशासन ढिम्म हलत नसल्याचे पाहून, जनहितासाठी आक्रमक पवित्रा घेत सभापती ज्योत्सना धवसे यांनी २३ एप्रिल २०२६ रोजी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे उच्चस्तरीय हस्तक्षेपाची मागणी करणारे पत्र पाठवले होते. ई-ऑफिस प्रणालीद्वारे हे पत्र थेट जिल्हा सह आयुक्तांच्या टेबलवर धडकले.
जिल्हा सह आयुक्तांचा थेट ‘अतितत्काळ’ झटका ! पत्रातील गांभीर्य ओळखून जिल्हा सह आयुक्त (नगर विकास शाखा) डॉ. विकास खंडारे यांनी मुख्याधिकाऱ्यांना थेट 'अतितत्काळ / महत्वाचे' असा अधिकृत दणका दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रातील शब्द न् शब्द नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभारावर मिरची झोंबवणारे ठरले आहेत.
"या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः व्यक्तीशः जागेवर जाऊन शहानिशा करावी, नियमांनुसार तात्काळ कडक कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ उलट टपाली जिल्हाधिकारी कार्यालया सादर करावा," असे स्पष्ट आणि कडक आदेश डॉ. खंडारे यांनी दिले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती थेट मा. जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या स्वीय सहायकांना (CA) सादर करण्यात आली आहे.
आता तरी सुस्त कारभाऱ्यांची झोप उडणार का ? नेहमी पळवाटा शोधणाऱ्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाला आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला उत्तर द्यावे लागणार आहे. सभापती ज्योत्सना धवसे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या थेट हस्तक्षेपामुळे आता नगरपंचायतीच्या सुस्त अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
आता मुख्याधिकारी यावर काय कारवाई करतात आणि शहराला घाणीच्या साम्राज्यातून कधी मुक्त करतात, की पुन्हा कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेतात ? याकडे संपूर्ण नांदगाववासीयांचे लक्ष लागले आहे.