उमरखेड :
ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा हिशोब आणि निधीच्या खर्चाची माहिती वारंवार मागूनही ती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप यवतमाळ जिल्ह्यातील चुरमुरा येथील नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे माहिती मागितली की संबंधित ग्रामसेवक आणि सरपंच तब्येतीचे कारण सांगून रुग्णालयात दाखल होतात, असा अजब प्रकार समोर आला असून याप्रकरणी चुरमुरा येथील 'गब्बर टीम'च्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड तालुक्यातील चुरमुरा ग्रामपंचायतीमध्ये मागील ५ वर्षांत किती निधी प्राप्त झाला, कोणती विकासकामे झाली आणि त्यावर किती खर्च झाला, याची अधिकृत माहिती गावातील सजग नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे मागितली आहे. मात्र, ही माहिती अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. जेव्हा जेव्हा माहितीचा तगादा लावला जातो, तेव्हा संबंधित ग्रामसेवक व सरपंच अचानक आजारी पडतात आणि रुग्णालयात भरती होतात, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे."आम्हाला दोषी धरू नका!"'गब्बर टीम'च्या कार्यकर्त्या कविता राठोड यांनी उमरखेड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही कोणालाही मानसिक किंवा शारीरिक त्रास देत नसून केवळ ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहावी म्हणून कायदेशीर मार्गाने निधीची माहिती मागत आहोत. परंतु, माहिती देण्यास विलंब करण्यासाठीच हा रुग्णालयात दाखल होण्याचा बनाव केला जात आहे का? याची निष्पक्ष चौकशी व्हावी. भविष्यात जर संबंधित ग्रामसेवक किंवा सरपंचांची तब्येत खरोखर खराब झाली किंवा त्यांना कोणतीही वैद्यकीय अडचण निर्माण झाली, तर त्यासाठी आम्हाला जबाबदार धरू नये."आंदोलनाचा इशारा:प्रशासनाने चुरमुरा ग्रामपंचायतीच्या मागील ५ वर्षांतील निधी आणि खर्चाची सखोल चौकशी करून संपूर्ण माहिती तात्काळ गावकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदकांकडून करण्यात आली आहे. जर ही माहिती वेळेत मिळाली नाही, तर 'गब्बर टीम'च्या वतीने लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने तीव्र उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही कविता राठोड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या प्रकरणावर आता पोलीस आणि प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.