नांदगाव खंडेश्वरकरांसाठी मोठी बातमी ! अखेर ‘त्या’ जागेचा प्रश्न सुटला; मलनिःसारण केंद्रासाठी (S.T.P.) ०.६० हेक्टर जागा मंजूर

नांदगाव खंडेश्वरकरांसाठी मोठी बातमी ! अखेर ‘त्या’ जागेचा प्रश्न सुटला; मलनिःसारण केंद्रासाठी (S.T.P.) ०.६० हेक्टर जागा मंजूर

  • मुख्याधिकारी निवृत्ती भालकर व आरोग्य निरीक्षक प्रितम सोनटक्के यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश
  • अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आदेश; नांदगाव खंडेश्वर नगरपरिषदेला मिळाला 'आगाऊ ताबा'

**नांदगाव खंडेश्वर:**नांदगाव खंडेश्वर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रलंबित असलेल्या मलनिःसारण केंद्र (Sewage Treatment Plant - S.T.P.) प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मौजा मुंडझंजारराव येथील ई-क्लास जमिनीपैकी ०.६० हेक्टर आर (दीड एकर) जागा नगरपरिषदेला भोगवटामुल्यरहित 'आगाऊ ताबा' देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केले आहेत. मुख्याधिकारी निवृत्ती भालकर आणि आरोग्य व स्वच्छता निरीक्षक प्रितम सोनटक्के यांच्या प्रशासकीय पातळीवरील अत्यंत चिकाटीच्या आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या प्रकल्पाला अखेर यश आले आहे.


काय आहे नेमकी पार्श्वभूमी?
नांदगाव खंडेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांनी मौजा मुंडझंजारराव येथील सव्र्व्हे नंबर ७ मधील एकूण १.९१ हेक्टर क्षेत्रापैकी १.०० हेक्टर आर जागेची मागणी महसूल विभागाकडे केली होती. नगरपरिषदेच्या १२ मे २०२६ रोजीच्या अहवालानुसार, या सव्र्व्हे क्रमांकामधील उत्तरेकडील ०.६७ हेक्टर आर जागा प्रारूप विकास योजनेनुसार (Draft Development Plan) मलनिःसारण केंद्रासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती.
यानंतर उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांच्या मोजणीच्या क-प्रतीमध्ये S.T.P. प्रकल्पासाठी ०.६० हेक्टर क्षेत्र दर्शवण्यात आले. मुख्याधिकारी यांनी ३ जून २०२६ रोजी पत्राद्वारे स्पष्ट केले होते की, मलनिःसारण केंद्राच्या उभारणीसाठी ६० आर (०.६० हे.) जागा पूर्णपणे पुरेशी आहे. त्यानुसार प्रशासकीय स्तरावर हालचाली वेगावल्या आणि अखेर ०.६० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांनुसार दिला 'आगाऊ ताबा'
या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४० आणि महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ च्या नियम ३, ६ (३) (ब) मधील कायदेशीर तरतुदींचा आधार घेतला. तसेच महसूल व वनविभागाचे शासन निर्णय दि. २७ जुलै २०११ व दि. २२ ऑक्टोबर २०१८ मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मौजा मुंडझुजारराव स.न. ७ मधील ०.६० हेक्टर आर (ई-क्लास) जागा मुख्याधिकारी, न.प. नांदगाव खंडेश्वर यांना आवश्यक अटी व शर्तींच्या अधीन राहून 'भोगवटामुल्यरहित आगाऊ ताबा' म्हणून देण्याचे आदेश जारी केले.
शहराच्या स्वच्छता आणि आरोग्याला मिळणार गती
हा प्रकल्प नांदगाव खंडेश्वर शहराच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. शहराचे आरोग्य आणि स्वच्छता अबाधित राखण्यासाठी आधुनिक मलनिःसारण केंद्र उभारण्याची अत्यंत गरज होती. आता जागेची अधिकृत मंजुरी मिळाल्यामुळे प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. मुख्याधिकारी निवृत्ती भालकर आणि आरोग्य निरीक्षक प्रितम सोनटक्के यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल शहरातून तसेच राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे. आभार व्यक्तकर्ती - सौ.प्रांजली राहुल गुल्हाने नगरसेविका नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर