नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतचे कर्तव्यदक्ष अभियंता मो. राहिल अहमद यांची बदली रद्द करा ; नगराध्यक्ष प्राप्तीताई मारोटकर यांची प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी



नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतचे कर्तव्यदक्ष अभियंता मो. राहिल अहमद यांची बदली रद्द करा; नगराध्यक्ष प्राप्तीताई मारोटकर यांची प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी
नांदगाव खंडेश्वर - 
स्थानिक नगर पंचायतचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय सीएलटीसी (CLTC) अभियंता मो. राहिल अहमद मो. हारुण यांची नुकतीच अन्य ठिकाणी बदली झाली आहे. मात्र, त्यांचे उत्तम काम आणि शहराच्या विकासकामांची गरज लक्षात घेता, त्यांना सध्या कार्यमुक्त करू नये, अशी मागणी नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतच्या नगराध्यक्ष सौ. प्राप्तीताई विलासराव मारोटकर यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे एका पत्राद्वारे केली आहे. नगराध्यक्षांच्या या भूमिकेमुळे मो. राहिल अहमद यांच्या बदलीला सध्या स्थगिती मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, शहरात या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे.
विकासकामांना खिळ बसण्याची भीती
अभियंता मो. राहिल अहमद यांनी आपल्या कार्यकाळात नांदगाव खंडेश्वर शहरातील विविध शासकीय योजना, घरकुल योजना आणि पायाभूत सुविधांची कामे अत्यंत प्रामाणिकपणे आणि गतीने पूर्ण केली आहेत. अनेक महत्त्वाचे प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. अशा महत्त्वपूर्ण टप्प्यावर त्यांची बदली झाल्यास शहराच्या विकासकामांना खिळ बसेल आणि सर्वसामान्यांची कामे रखडतील, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
 प्रशासनाला दिलेल्या पत्रात मो. राहिल अहमद यांच्या कर्तव्यदक्षतेचा विशेष गौरव केला आहे. "मो. राहिल अहमद हे अत्यंत प्रामाणिक, कार्यक्षम आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले अधिकारी आहेत. नगर पंचायत क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या योजना त्यांच्या देखरेखीखाली सुरू आहेत. शहराच्या हितासाठी आणि विकासकामांचा वेग कायम ठेवण्यासाठी त्यांना सध्या नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतधून कार्यमुक्त करण्यात येऊ नये, तसेच त्यांची बदली थांबवण्यात यावी," अशी आग्रही विनंती केल्याचे समजते.
या संदर्भात नागरिक, लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांकडून मोठा पाठिंबा मिळत असून, आता प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.