वडिलांचाही मृत्यू; दुहेरी दुःखातही जयसिंगपूरे कुटुंबाने घडवले नेत्रदानाचे आदर्श

वडिलांचाही मृत्यू; दुहेरी दुःखातही जयसिंगपूरे कुटुंबाने घडवले नेत्रदानाचे आदर्श

नेर - 
नियतीच्या क्रूर आघातामुळे खरडगाव येथील जयसिंगपूरे कुटुंबावर अवघ्या पाच दिवसांत दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मेंदूच्या आजाराने तरुण मुलाचे वय वर्ष ३५ मध्ये अकाली निधन झाले. या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच, अवघ्या पाच दिवसांनी वृद्ध वडिलांचीही प्राणज्योत मालवली. या अत्यंत कठीण आणि वेदनादायी प्रसंगातही सामाजिक भान राखत जयसिंगपूरे कुटुंबाने घेतलेल्या नेत्रदानाच्या निर्णयामुळे संपूर्ण परिसरातून त्यांच्याविषयी आदर व्यक्त होत आहे.
खरडगाव येथील गजाननराव जयसिंगपूरे (६४) यांचे तरुण सुपुत्र (३५) यांचे नुकतेच मेंदूच्या गंभीर आजाराने निधन झाले होते. ऐन उमेदीच्या काळात तरुण मुलाचा डोळ्यादेखत अंत झाल्याने वृद्ध वडील गजाननराव यांना याचा प्रचंड मानसिक धक्का बसला. या दुःखातून ते सावरू शकले नाहीत आणि मुलाच्या निधनानंतर अवघ्या पाचव्या दिवशी, सोमवारी (३१ ऑगस्ट) त्यांचीही प्राणज्योत मालवली.
जयसिंगपूरे कुटुंबातील दोन महत्त्वाच्या व्यक्ती एकामागून एक सोडून गेल्याने संपूर्ण खरडगावावर शोककळा पसरली आहे. खरडगावच्या सरपंच सोनाली जयसिंगपूरे यांनी या अत्यंत कठीण प्रसंगात स्वतःला आणि कुटुंबाला धीर दिला. कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही, त्यांनी आणि संपूर्ण जयसिंगपूरे परिवाराने सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समोर ठेवले. गजाननराव यांच्या निधनानंतर त्यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेण्यात आला. संबंधित वैद्यकीय यंत्रणेने तात्काळ खरडगावात पोहोचून पुढील कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केली.
मुलाच्या आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, अशा भीषण दुःखाच्या प्रसंगातही अंधाराचा स्वीकार न करता, कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यासाठी जयसिंगपूरे कुटुंबाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरला आहे. त्यांच्या या निर्णयाने मृत्यूनंतरही माणुसकी जिवंत ठेवण्याचा एक मोठा संदेश समाजाला दिला आहे.