शासकीय पत्रात ‘ठाकरे गटाच्या’ नेत्याचे नाव; उपसभापती सचिन अहीर यांच्या दौऱ्यावरून नांदगाव खंडेश्वरमध्ये राजकीय भूकंप !
• स्थानिक शिंदे सेनेत तीव्र असंतोष; माजी मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर शासकीय दौऱ्यात ऐनवेळी बदल
• उप मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार जाणार ; शिंदे सेना आक्रमक
नांदगाव खंडेश्वर :
महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहीर यांच्या २ ऑक्टोबर रोजीच्या अधिकृत शासकीय दौऱ्यामुळे अमरावती जिल्ह्यातील, विशेषत : नांदगाव खंडेश्वर येथील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या दौऱ्याच्या अधिकृत शासकीय पत्रकात थेट विरोधी पक्षातील नेत्याच्या नावाचा उल्लेख असल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात, विशेषतः शिंदे सेनेत (शिवसेना) एकच खळबळ उडाली आहे.
शासकीय पत्रकातील 'त्या' नावामुळे खळबळ
उपसभापती सचिन अहीर यांच्या शासकीय दौऱ्याच्या अधिकृत पत्रकात नांदगाव खंडेश्वर येथील ठाकरे गटाचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा नेते व नगरसेवक प्रकाशभाऊ मारोटकर यांच्या नावाचा आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राप्ती मारोटकर यांच्या निवासस्थानाचा अधिकृत भेट म्हणून उल्लेख करण्यात आला होता. सचिन अहीर हे शिंदे सेनेचे मोठे नेते असताना, त्यांच्या अधिकृत दौऱ्यात चक्क उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्याच्या घराचा उल्लेख झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले.
दरम्यान, स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपसभापती सचिन अहीर आणि नगरसेवक प्रकाशभाऊ मारोटकर यांचे जुने वैयक्तिक कौटुंबिक संबंध आहेत. याच संबंधांमुळे हे नाव शासकीय पत्रकात आले असण्याची शक्यता आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर या शासकीय पत्रकामुळे मोठे अंतर्गत राजकीय नाट्य रंगले.
स्थानिक शिंदे सेनेत प्रचंड नाराजी; माजी मंत्र्यांचा हस्तक्षेप
आपल्याच पक्षाच्या एका बड्या नेत्याचा आणि घटनात्मक पदावरील व्यक्तीचा अधिकृत दौरा असताना नांदगाव खंडेश्वर येथील स्थानिक शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यातच विरोधी गटाच्या नेत्याच्या घरी भेट निश्चित झाल्याने शिंदे सेनेच्या स्थानिक गोटात तीव्र नाराजी पसरली.
कार्यकर्त्यांमधील वाढता असंतोष आणि संभाव्य 'नाराजी नाट्य' लक्षात घेता, अमरावती जिल्ह्यातील एका आमदार असलेल्या माजी मंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणात थेट फोनवरून हस्तक्षेप केला. या वरिष्ठ पातळीवरील हस्तक्षेपानंतर प्रशासकीय यंत्रणा तातडीने हलली आणि उपसभापतींच्या शासकीय दौरा कार्यक्रमात ऐनवेळी बदल करण्यात आला.
अखेर वादावर पडदा; दोन्ही नेत्यांच्या घरी सदिच्छा भेट
नियोजनातील या अभूतपूर्व गोंधळानंतर निर्माण झालेला वाद निवळण्यासाठी उपसभापती सचिन अहीर यांनी मध्य मार्ग काढला. त्यांनी उबाठा सेनेचे युवा नेते नगरसेवक प्रकाशभाऊ मारोटकर यांच्या निवासस्थानी भेट दिली, तसेच शिंदे सेनेचे नांदगाव खंडेश्वर तालुकाप्रमुख पवन ठाकरे यांच्या काकांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली. तालुकाप्रमुखांच्या घरी झालेल्या या भेटीनंतर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमधील आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील नाराजी तूर्तास शांत झाली असून, वादाला पूर्णविराम मिळाला आहे.
थेट उफमुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार; पदाधिकारी यांची प्रतिक्रिया
या संपूर्ण नाट्यमय घडामोडीबाबत आणि नियोजनातील गोंधळाबाबत प्रतिनिधीने शिंदे सेनेचे पदाधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधला. असता आपली आक्रमक भूमिका मांडली,
"हा अत्यंत गंभीर प्रकार असून, शासकीय दौऱ्याच्या नियोजनात स्थानिक पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवणे पूर्णपणे चुकीचे आहे. या संपूर्ण घटनेची अधिकृत माहिती आणि स्थानिक कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी आम्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांमार्फत थेट वरिष्ठ पातळीवर पोहोचवली आहे. उप मुख्यमंत्र्यांपर्यंत (एकनाथ शिंदे) ही बाब नेण्यात आली असून यावर योग्य ती कारवाई होईल."
पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर तालुका प्रमुख पवन ठाकरे यांच्या शांतप्रिय भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर जरी हा वाद तूर्तास शांत झाला असला, तरी या निमित्ताने शिंदे सेनेतील पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव आणि शासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार उघडा पडला आहे. सचिन अहीर यांच्या या दौऱ्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदगाव खंडेश्वरच्या राजकीय वर्तुळात मोठी चुरस निर्माण केली आहे.
मा.ना. सचिन अहिर उपसभापती विधानपरिषद यांच्या दौऱ्याबाबत माझे मत - पवन ठाकरे तालुका प्रमुख शिंदेसेना नांदगाव खंडेश्वर
तालुका काल सायंकाळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची पाहणी करण्याबाबत जिल्हाप्रमुख आशिषजी धर्माळे यांनी मला दूरध्वनीवरून माहिती दिली.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी सचिन अहिर साहेबांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात सर्व शेतकरी, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शेताच्या बांधावर घेऊन जाऊन वस्तुस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
शेतकरी हितासाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जो कोणी आमच्यासोबत येईल, त्याला पक्षीय भेद न करता सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे काम करण्याची आमची भूमिका आहे.
या अनुषंगाने तालुका पदाधिकाऱ्यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन दौरा व संघटनात्मक कामकाजाबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांच्या अडचणी, दुष्काळाची परिस्थिती आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.
पवन ठाकरे
शिवसेना तालुका प्रमुख, नांदगाव खंडेश्वर